पिस्तूल बाळगणाऱ्या २६ वर्षीय डिलीव्हरी बॉयला वाकड पोलिसांनी केली अटक
पिंपरी, ता. २५ - विनापरवाना जिवंत काडतूसासह पिस्तूल बाळगणाऱ्या २६ वर्षीय डिलीव्हरी बॉयला वाकड पोलिसांनी शुक्रवारी (ता. २४) ताथवडे परिसरातून अटक केली आहे. महेश गंगाधर साळवे (वय २६ वर्षे, रा. वाकड) असे या डिलीव्हरी बॉयचे नाव आहे.
पोलीस हवालदार वंदु दत्तात्रय गिरे यांनी फिर्याद नोंदवली आहे. वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ताथवडे येथील जेएसपीएम कॉलेजच्या पाठीमागील मोकळ्या मैदानात तो पिस्तूलासह सापडला. सदर शस्त्रावर कोणतेही निर्मात्याचे नाव, क्रमांक किंवा ओळख चिन्ह नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करून आरोपीने शस्त्र बाळगल्याचेही स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी या तरुणावर भारताचा शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३ (२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) (३) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.