अवैध गॅस रिफिलिंग करणाऱ्या दुकानदाराला अटक
पिंपरी, ता. १२ - खेड तालुक्यातील लोखंडे वस्ती, चिंबळी येथे धोकादायक पद्धतीने अवैध गॅस रिफिलिंग करणाऱ्या गॅस रिपेअरिंग दुकानदाकाला पोलिसांनी अटक केली आहे. गजानन रामराव पौळ (वय ४५, व्यवसाय - भांडयाचे दुकान व गॅस रिपेरिंग) असे अटक दुकानदाराचे नाव आहे.
गजानन पौळ यांनी घरगुती व अत्यावश्यक सेवेतील गॅस सिलेंडर बेकायदेशीरपणे खरेदी करून मोठ्या सिलेंडर टाक्यातून छोट्या ४ किलो वजनाच्या लोखंडी सिलेंडरमध्ये रिफिलिंग सर्किटच्या साहाय्याने धोकादायक पद्धतीने गॅस ट्रान्सफर केला. ही कृती लोकांच्या जीवितास धोका निर्माण करणारी होती. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पौळ यांनी अवैधरित्या सुमारे ३०,४००/- रुपये किंमतीचा गॅस साठा आणि संबंधित साहित्य जवळ ठेवले होते.
घटनेची फिर्याद पोलिस शिपाई अमित अनिल डिखळे (वय ३८, आळंदी पोलीस स्टेशन) यांनी दिली. आरोपीवर आळंदी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २८७ सह जिवनावश्यक वस्तुचा कायदा १९५५ चे कलम ३,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.