निघोजे येथे बिगरपरवाना गॅस रिफिलिंगवर कारवाई; युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
पिंपरी, ता. १२ - निघोजे (ता. खेड) येथील जय मल्हार हॉटेलजवळील एका टपरीमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरमधून लहान सिलेंडरमध्ये बेकायदेशीररीत्या गॅस रिफिलिंग सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करत एकास ताब्यात घेतले. या प्रकरणी धिरज बालाजी सूर्यवंशी (वय २१, मूळ रा. हलगरा, ता. निलंगा, जि. लातूर, सध्या रा. निघोजे, ता. खेड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जून रोजी रात्री सुमारे ८.४० वाजण्याच्या सुमारास डीके चौक ते निघोजे मार्गावरील जय मल्हार हॉटेलजवळील टपरीमध्ये आरोपी व्यावसायिक गॅस सिलेंडरमधून लहान सिलेंडरमध्ये धोकादायक पद्धतीने रिफिलिंग करत होता. ज्वलनशील पदार्थ हाताळताना परिसरातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, याची जाणीव असूनही त्याने ही कृती केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
या कारवाईत पोलिसांनी सुमारे ५ हजार ७०० रुपयांचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी पोलीस शिपाई गणेश बापू नागरगोजे यांनी फिर्याद दिली असून दक्षिण महाळुंगे पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम २८७, २८८ तसेच जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.