पिंपरी-चिंचवड : काळेवाडीतील जगताप डेअरी परिसरात दागिन्यांच्या विक्रीचा व्यवसाय लावत असताना आई-मुलीला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेत ७० वर्षीय महिलेला गंभीर दुखापत झाल्याची तक्रार काळेवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३०च्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी शुक्रवारी (६ नोव्हेंबर) काळेवाडी पोलीस ठाण्यात एका महिलेने दिनेश नरेश सासी आणि एका महिलेविरुद्ध तक्रार नोंदवली आहे.
तक्रारीत नमूद केल्यानुसार, महिला आणि त्यांची आई दागिन्यांच्या विक्रीचा व्यवसाय लावत होत्या. त्यावेळी आरोपी महिलेने दोघींना शिवीगाळ केली. त्यानंतर वृद्ध महिलेच्या डोक्यावर आणि तोंडावर लाकडी दांडक्याने मारण्यात आले.
या हल्ल्यात वृद्ध महिला गंभीर जखमी झाली असल्याचे तक्रारीत नमूद आहे. दिनेश सासी याने तक्रारदार महिलेच्या डोळ्यावर हाताने ठोसा मारल्याचा आरोप आहे. त्यावेळी त्याच्या हातातील अंगठी महिलेला लागल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
काळेवाडी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३५१(२), (३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील पुढील तपास करत आहेत.