पिंपरी-चिंचवड : चिखलीतील नेवाळेवस्ती येथे एका अल्पवयीन मुलाला चौघांनी मारहाण करून धमकावल्याची घटना घडली आहे. तसेच मित्राला वाचवण्यासाठी आलेल्या मुलालाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी एका चारजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (५ नोव्हेंबर) नेवाळेवस्तीतील फटाक्यांच्या स्टॉलजवळ ही घटना घडली. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात शुक्रवारी (६ नोव्हेंबर ) रोजी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये विशाल डाबेराव (वय २१), ओमकार वाळुंज (वय २१), रोहन पाटील (वय २०) या तीनजणांसह एका अनोळखी व्यक्तीचा समावेश आहे.
तक्रारीनुसार, चौघांनी मुलाला शिवीगाळ करून मारहाण केली. रोहन पाटील याने मुलाच्या डोक्याच्या मागच्या बाजूला दगडाने मारले, तर विशाल डाबेराव याने बेल्टने पाठीवर मारहाण केल्याचा आरोप आहे. ओमकार वाळुंज याने वाहनाच्या चावीने डोक्यावर आणि छातीवर मारून दुखापत केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
पुन्हा दिसल्यास सोडणार नाही, अशी धमकीही देण्यात आल्याचे मुलाने पोलिसांना सांगितले. मारहाण थांबवण्यासाठी त्याचा मित्र पुढे आला असता त्यालाही मारहाण करून दुखापत केल्याची नोंद आहे.
भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस पुढील तपास करत आहेत.