पिंपरी : गणेशोत्सवाच्या उत्साहात पिंपरी गावातील यशादा फ्लोरेंझा को-ऑप. हौसिंग सोसायटीमध्ये महिलांसाठी आयोजित ‘खेळ पैठणीचा - होम मिनिस्टर’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध मनोरंजक खेळ, प्रश्नमंजुषा आणि गंमतीदार उपक्रमांमुळे कार्यक्रमात चांगलीच रंगत आली. अंतिम फेरीत सुषमा यादव यांनी प्रथम क्रमांक पटकावत मानाची पैठणी जिंकली.
यशादा फ्लोरेंझा सोसायटीचे चेअरमन ॲड. उमेश खंदारे यांच्या पुढाकाराने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध कलाकार चंद्रकांत नगरकर यांनी आपल्या खास विनोदी शैलीत सूत्रसंचालन केले. सोसायटीतील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत विविध फेऱ्यांमध्ये आपले कौशल्य दाखवले.
स्पर्धेच्या अंतिम फेरीत सुषमा यादव यांनी प्रथम क्रमांक पटकावत मानाची पैठणी जिंकली. वर्षा मोहनानी यांनी द्वितीय, तर काजल उदासी यांनी तृतीय क्रमांक मिळविला. स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेला आकर्षक बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी सोनाली खंदारे, ज्योती उदासी, स्वाती सोनवणे, शलाका कदम, भाग्यश्री देठे, विनेश आहूजा, अमृता आसबे, योगेश सोनवणे, राहुल खैरनार, नारायण पाटील, नितीन आसबे आणि विनिश आहुजा यांनी विशेष परिश्रम घेतले.
गणेशोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात महिलांना विरंगुळा आणि मनोरंजनाची संधी मिळावी, तसेच सोसायटीतील सामाजिक व सांस्कृतिक सलोखा अधिक दृढ व्हावा, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या शेवटी चेअरमन ॲड. उमेश खंदारे यांनी विजेत्या महिला, सर्व स्पर्धक आणि उपस्थितांचे आभार मानले.