लाडकी बहीण योजना : ई-केवायसीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार – अदिती तटकरे

लाडकी बहीण योजना : ई-केवायसीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार – अदिती तटकरे

मुंबई-पिंपरी | १९ नोव्हेंबर २०२६ : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवण्यात आलेल्या ९१ लाखांहून अधिक महिलांना पुन्हा योजनेचा लाभ मिळावा, या मागणीसाठी कष्टकरी संघर्ष महासंघाच्या शिष्टमंडळाने महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी योजनेतील ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन मंत्री तटकरे यांनी दिल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष तथा कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी दिली.

कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने १ सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर ‘लाडक्या बहिणींचा आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला होता. या मोर्चाच्या माध्यमातून योजनेचा लाभ बंद झालेल्या महिलांचे प्रश्न राज्य सरकारसमोर मांडण्यात आले होते. त्यानंतर या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी नखाते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंत्री तटकरे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

यावेळी ई-केवायसी किंवा तांत्रिक अडचणींमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या पात्र महिलांना पुन्हा संधी द्यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच निराधार, विधवा आणि परित्यक्त्या महिलांच्या आर्थिक मदतीत वाढ करावी आणि असंघटित क्षेत्रातील कष्टकरी महिलांना योजनेत प्राधान्य द्यावे, अशा मागण्याही निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

या चर्चेदरम्यान मंत्री अदिती तटकरे यांनी ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्तरावर होणार असल्याचे सांगितल्याची माहिती महासंघाने दिली. यासंदर्भात अनेक महिलांचे अर्ज प्राप्त होत असून, या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे नखाते यांनी सांगितले.

यावेळी काशिनाथ नखाते म्हणाले की, लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक मदतीची योजना नसून महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाशी आणि सामाजिक न्यायाशी संबंधित महत्त्वाचा विषय आहे. या योजनेतून मिळणाऱ्या आर्थिक मदतीच्या आधारे अनेक महिलांनी वर्षभराचे आर्थिक नियोजन केले होते. मात्र, लाभ अचानक बंद झाल्याने त्यांचे आर्थिक नियोजन विस्कळीत झाल्याचे त्यांनी सांगितले.

पात्र आणि गरजू महिलांना पुन्हा योजनेत समाविष्ट करून आर्थिक मदत सुरू करणे आवश्यक असल्याची मागणी त्यांनी केली. तांत्रिक कारणांमुळे कोणतीही पात्र महिला लाभापासून वंचित राहू नये, अशी महासंघाची भूमिका असल्याचेही नखाते यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी मागील महिन्यात राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्यासोबतही या विषयावर चर्चा करण्यात आली होती. महिलांच्या हक्कांसाठी आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचे नखाते यांनी सांगितले.

या भेटीदरम्यान कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, उपाध्यक्ष राजेश माने, अनिल चौरे, सखाराम केदार आणि लाला राठोड उपस्थित होते.

दरम्यान, ई-केवायसी पुन्हा सुरू करण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झाल्याची माहिती देण्यात आलेली नाही. या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन मिळाल्याचे महासंघाने सांगितले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories