पिंपरी-चिंचवड | १९ नोव्हेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवड शहरात यंदाच्या दिवाळीत फटाक्यांमुळे आगीच्या तब्बल ७६ घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनांची गंभीर दखल घेत स्थायी समितीच्या बैठकीत आगीस कारणीभूत ठरलेल्या आणि निष्काळजीपणा करणाऱ्या व्यक्तींवर तातडीने गुन्हे दाखल करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. तसेच शहराची वाढती व्याप्ती लक्षात घेऊन महापालिकेची अग्निशमन यंत्रणा अधिक आधुनिक आणि सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे.
दिवाळी आणि लक्ष्मीपूजनादरम्यान शहरात घडलेल्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्थायी समितीच्या बैठकीत विशेष आढावा घेण्यात आला. या बैठकीत स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी अग्निशमन विभागाच्या कामगिरीचे कौतुक करत भविष्यात अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या.
बैठकीत देण्यात आलेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या कालावधीत शहरात आगीच्या एकूण ७६ घटना नोंदविण्यात आल्या. यातील जवळपास ९० टक्के घटना फटाक्यांमुळे घडल्याचे सांगण्यात आले. विशेषतः रॉकेट आणि उंचावर उडणारे फटाके दुसऱ्यांच्या घरात, इमारतींच्या गॅलरीत किंवा इतर परिसरात गेल्यामुळे आगी लागल्याचे नमूद करण्यात आले.
या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आगीच्या घटनांमागील कारणांची तपासणी करून संबंधित व्यक्तींची जबाबदारी निश्चित करावी आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.
अग्निशमन विभाग अधिक अद्ययावत करण्यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली. शहराचा वाढता विस्तार, उंच इमारतींची संख्या आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत पोहोचविण्याची गरज लक्षात घेऊन अग्निशमन यंत्रसामग्री अधिक आधुनिक करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी अभिषेक बारणे म्हणाले, "दिवाळीत शहरात फटाक्यांमुळे आगीच्या ७६ हून अधिक घटना घडल्या आहेत, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. जरी आपल्या अग्निशमन दलाने यावर त्वरित नियंत्रण मिळवून मोठे नुकसान टळले असले, तरी नागरिकांच्या जीविताशी आणि सुरक्षेशी खेळणाऱ्यांना पाठीशी घातले जाणार नाही."
ज्यांच्यामुळे किंवा ज्यांच्या दुर्लक्षामुळे आगीच्या घटना घडल्या आहेत, अशा दोषींवर महापालिकेने तातडीने गुन्हे दाखल करावेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.
तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देता यावा, यासाठी अग्निशमन यंत्रणा आणि यंत्रसामग्री अत्याधुनिक करून विभाग पूर्णपणे सज्ज ठेवण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
दरम्यान, या आढावा बैठकीत अग्निशमन दलाने आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी केलेल्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि संबंधित विभागाची सज्जता वाढविण्यावर भर देण्यात आला आहे.