पिंपरी-चिंचवड | १८ नोव्हेंबर २०२६ : पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव आणि रहाटणी परिसरातील नागरिकांना वाकड मेट्रो स्टेशनपर्यंत नियमित आणि थेट पीएमपीएमएल बससेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल (नाना) काटे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी १८ नोव्हेंबर रोजी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन दिले आहे.
पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव आणि रहाटणी हा परिसर गेल्या काही वर्षांत वेगाने विकसित झाला आहे. या भागातील लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, आयटी क्षेत्रातील कर्मचारी, खासगी कंपन्यांमधील नोकरदार, महिला कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. मात्र, या परिसरातून वाकड मेट्रो स्टेशनपर्यंत जाण्यासाठी नियमित आणि थेट सार्वजनिक बससेवा उपलब्ध नसल्याने नागरिकांना प्रवासात अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे काटे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो सेवा सुरू झाल्यामुळे नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतुकीचा महत्त्वाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. मात्र, मेट्रो स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेली बससेवा उपलब्ध नसल्याने अनेक प्रवाशांना खासगी वाहने, दुचाकी किंवा इतर पर्यायी वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून राहावे लागत आहे.
विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी कार्यालयीन वेळेत या परिसरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे कामावर जाणाऱ्या नोकरदारांना आणि विद्यार्थ्यांना प्रवासासाठी अधिक वेळ द्यावा लागतो. तसेच पर्यायी वाहतुकीमुळे नागरिकांचा आर्थिक खर्चही वाढत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या भागातून मोठ्या संख्येने महिला कर्मचारी दररोज नोकरीसाठी प्रवास करतात. त्यांच्यासाठी सुरक्षित, नियमित आणि वेळेत उपलब्ध होणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आवश्यक असल्याचे काटे यांनी स्पष्ट केले आहे. थेट बससेवा सुरू झाल्यास महिला कर्मचारी, विद्यार्थी, आयटी क्षेत्रातील नोकरदार आणि औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो.
वाकड मेट्रो स्टेशनपर्यंत बससेवा सुरू झाल्यास खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होण्याबरोबरच प्रदूषण नियंत्रणालाही हातभार लागू शकतो, असे काटे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
मेट्रो आणि बससेवा यांच्यात योग्य समन्वय निर्माण झाल्यास नागरिकांना घरापासून मेट्रो स्टेशनपर्यंतचा प्रवास अधिक सुलभ होईल. त्यामुळे पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव आणि रहाटणी परिसरातून वाकड मेट्रो स्टेशनपर्यंत नियमित व थेट पीएमपीएमएल बससेवा सुरू करण्याची मागणी विठ्ठल (नाना) काटे यांनी प्रशासनाकडे केली आहे.