पिंपरी-चिंचवड | १७ नोव्हेंबर २०२६ : वाकड, पुनावळे आणि ताथवडे परिसरातील वाढते नागरीकरण आणि लोकसंख्या लक्षात घेता, नागरिकांना त्यांच्या परिसरातच टपाल सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी पुढे आली आहे. पुनावळे आणि ताथवडे येथे केंद्र सरकारकडून मंजूर झालेल्या सब-पोस्ट ऑफिससाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नगरसेवक राहुल तानाजी कलाटे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
यासंदर्भात राहुल कलाटे यांनी सप्टेंबर २०२६ मध्ये महापालिका आयुक्तांना पत्र दिले होते. मंजूर झालेली टपाल कार्यालये प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी जागेचा प्रश्न मार्गी लावण्याची आवश्यकता त्यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे.
भारत सरकारकडून पुनावळे आणि ताथवडे येथे स्वतंत्र सब-पोस्ट ऑफिस मंजूर करण्यात आले आहेत. त्यानुसार पुनावळे पोस्ट ऑफिससाठी ४११०८६, तर ताथवडे पोस्ट ऑफिससाठी ४११०८७ हा स्वतंत्र पिनकोड निश्चित करण्यात आला आहे. तसेच वाकड परिसरासाठी ४११०८८ हा स्वतंत्र पिनकोड देण्यात आल्याची माहिती कलाटे यांनी दिली आहे.
मात्र, पुनावळे आणि ताथवडे येथील मंजूर सब-पोस्ट ऑफिस सुरू करण्यासाठी आवश्यक जागेचा प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे महापालिकेने आपल्या उपलब्ध जागांचा विचार करून संबंधित टपाल विभागाला अल्पदरात कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
वाकड, पुनावळे आणि ताथवडे परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे नागरिकांना टपाल कार्यालयाशी संबंधित विविध सेवांची आवश्यकता भासत आहे. मात्र, स्थानिक पातळीवर सुविधा उपलब्ध नसल्यास नागरिकांना टपालविषयक कामांसाठी इतर भागांत जावे लागते.
नागरिकांना त्यांच्या परिसरातच टपाल सेवा, आर्थिक व्यवहार आणि पोस्ट ऑफिसशी संबंधित इतर सुविधा उपलब्ध व्हाव्यात, हा या मागणीमागील प्रमुख उद्देश असल्याचे राहुल कलाटे यांनी स्पष्ट केले.
पुनावळे आणि ताथवडे येथील मंजूर कार्यालये लवकरात लवकर कार्यान्वित झाल्यास संबंधित भागातील नागरिकांना टपाल सेवांचा लाभ घेणे अधिक सोयीचे होणार आहे. त्याचबरोबर वाकड परिसरातील टपाल सेवा अधिक सक्षम करण्याचीही आवश्यकता त्यांनी व्यक्त केली आहे.
नगरसेवक राहुल कलाटे यांनी वाकड, पुनावळे आणि ताथवडे या तिन्ही परिसरांतील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले.
मंजूर सब-पोस्ट ऑफिससाठी जागेचा प्रश्न लवकर मार्गी लागावा आणि नागरिकांना स्थानिक पातळीवर टपाल सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पुढील काळातही महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.