पिंपरी-चिंचवड | १९ नोव्हेंबर २०२६ : भारतीय संविधानाचा सन्मान, लोकशाही मूल्यांचे संवर्धन आणि युवा पिढीमध्ये संविधानाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड शहरात पहिल्यांदाच ‘संविधान सन्मान दौड-२०२६’ आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमाला महापालिकेच्या स्थायी समितीने सर्वानुमते मंजुरी दिली असून, दौडीच्या आयोजनासाठी १५ लाख रुपये, तर संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांसाठी एकूण ३९ लाख रुपयांच्या आर्थिक तरतुदीला मंजुरी देण्यात आली आहे. स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून शहरात भव्य संविधान सन्मान दौड आयोजित करण्याची संकल्पना महापालिकेच्या शहर सुधारणा समितीचे सदस्य तथा नगरसेवक डॉ. सुहास लक्ष्मण कांबळे यांनी मांडली होती. आमदार शंकर जगताप आणि महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी या उपक्रमासाठी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. यासंदर्भात लेखी पत्राद्वारे दौडीचे आयोजन करण्याची मागणी करण्यात आली होती.
या मागणीची दखल घेत नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मांडण्यात आला. सभापती अभिषेक बारणे यांच्या उपस्थितीत या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. तसेच यापुढे दरवर्षी संविधान सन्मान दौड आयोजित करण्याचा संकल्पही व्यक्त करण्यात आला.
प्रस्तावित संविधान सन्मान दौड साधारण दहा किलोमीटर अंतराची असणार आहे. यामध्ये शहरातील शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, युवक मंडळे, महिला बचत गट, क्रीडा संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग अपेक्षित आहे. हजारो नागरिकांना या उपक्रमात सहभागी करून घेण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
ही दौड केवळ क्रीडा स्पर्धेपुरती मर्यादित न ठेवता भारतीय संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय आणि राष्ट्रीय एकात्मता ही मूल्ये नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या माध्यमातून विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. संविधानाचे महत्त्व, नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये, लोकशाही व्यवस्था तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान निर्मितीतील योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यावर भर दिला जाणार आहे.
यावेळी स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे म्हणाले, "लोकशाही मूल्यांचा जागर, संविधानाप्रती आदर आणि सामाजिक समतेचा विचार नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. संविधान दिनानिमित्त शहरात व्यापक स्वरूपात कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ३९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये संविधान सन्मान दौडीसाठी स्वतंत्रपणे १५ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे."
शहरातील नागरिक, विद्यार्थी आणि युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन संविधान दिन जनजागृतीच्या माध्यमातून साजरा करण्याचा महापालिकेचा प्रयत्न राहणार असल्याचेही बारणे यांनी स्पष्ट केले.