टाकाऊ वस्तूंपासून कचराकुंडीचे सुशोभीकरण ; महापालिकेचा अनोखा उपक्रम

टाकाऊ वस्तूंपासून कचराकुंडीचे सुशोभीकरण ; महापालिकेचा अनोखा उपक्रम

पिंपरी : वारंवार कचरा साठणाऱ्या ठिकाणांचे (गार्बेज व्हल्नरेबल पॉइंट- GVP) सुशोभीकरण करून परिसर स्वच्छ आणि आकर्षक बनविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत 'ल' क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक 20 मधील डी. वाय. पाटील लॉ कॉलेज, फुलेनगर येथील कचरा साठणाऱ्या जागेचे टाकाऊ वस्तूंच्या कलात्मक पुनर्वापरातून सुशोभीकरण करण्यात आले आहे.

यापूर्वी या ठिकाणी वारंवार कचरा फेकण्यात येत होता. मात्र, निरुपयोगी वस्तूंचा कल्पकतेने वापर करून जागा अत्यंत आकर्षक रुपात बदलण्यात आली आहे. यामुळे परिसरातील सौंदर्यात भर पडली असून टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर आणि सर्वाजनिक स्वच्छतेचा संदेश यातून देण्यात येत आहे.

हा उपक्रम महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम आणि उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला आहे.

या उपक्रमासंदर्भात बोलताना महापौर रवि लांडगे म्हणाले, "शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवणे ही केवळ महापालिकेचीच जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकाचेही कर्तव्य आहे. टाकाऊ वस्तूंचा कलात्मक पुनर्वापर करून कचरा साठणाऱ्या ठिकाणांचे सुशोभीकरण करणे हा पर्यावरणपूरक उपक्रम आहे. अशा उपक्रमांमुळे स्वच्छतेसोबतच पुनर्वापराची संस्कृती विकसित होण्यास मदत होईल."

तर आयुक्त. विजय सुर्यवंशी यांच्या म्हणण्यानुसार, "वारंवार कचरा साठणाऱ्या ठिकाणांचे कायमस्वरूपी स्वरूपात रूपांतर करण्यासाठी केवळ स्वच्छता पुरेशी नाही, तर त्या जागांचा सकारात्मक वापर आणि सौंदर्यीकरणही महत्त्वाचे आहे." अशा नावीन्यपूर्ण संकल्पना शहरातील इतर ठिकाणीही राबविण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.

उपआयुक्त प्रदीप ठेंगल यांनी म्हटले की, "कचरा साठणाऱ्या ठिकाणी पुन्हा कचरा जमा होऊ नये, यासाठी सुशोभीकरण, नियमित स्वच्छता आणि नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे." यासाठी त्यांनी नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहनही केले. यावेळी नगरसदस्या वर्षा जगताप, आरोग्य निरीक्षक लक्ष्मण साळवे तसेच महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories