PCMC मध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांचे निर्देश

PCMC मध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांचे निर्देश

पिंपरी | १८ नोव्हेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधातील कारवाईला गती देण्याचे निर्देश महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी दिले आहेत. महापालिकेच्या मालकीच्या भूखंडांवरील अतिक्रमणे, सार्वजनिक पदपथांवरील अडथळे, रस्त्यांवरील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांवर नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील मधुकर पवळे सभागृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीला बांधकाम परवानगी विभागाचे सहशहर अभियंता सुनील बागवानी, कार्यकारी अभियंते, उपअभियंते, सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि बीट निरीक्षक उपस्थित होते.

बैठकीत महापालिकेच्या मालकीच्या भूखंडांवरील अतिक्रमणांचा आढावा घेण्यात आला. संबंधित भूखंडांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तयार करून पुढील आठवड्यात निष्कासनाची कारवाई करण्याचे निर्देश क्षेत्रीय अधिकारी, नगररचना विभागाचे अधिकारी आणि बीट निरीक्षकांना देण्यात आले.

शहरातील सार्वजनिक पदपथांवर होणाऱ्या अतिक्रमणांबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. नागरिकांना पदपथांचा वापर करता यावा, यासाठी क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील पदपथांवरील अतिक्रमणे हटविण्याची नियमित कारवाई सुरू ठेवावी, अशा सूचना देण्यात आल्या.

तसेच रस्त्यांवरील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणी सुरू असलेल्या प्राथमिक स्वरूपातील कामांची तातडीने पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले. विशेषतः अनधिकृत बांधकामांच्या फुटिंगच्या कामांची तपासणी करून संबंधित ठिकाणांची यादी तयार करावी आणि नियमानुसार निष्कासनाची कारवाई प्रस्तावित करावी, असे स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, दिवाळीच्या सुट्टीच्या कालावधीत शहरात अनधिकृत बांधकामे झाल्याबाबत महापालिकेकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने क्षेत्रीय अधिकारी आणि बीट निरीक्षकांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक कारवाई प्रस्तावित करण्याचे निर्देश देण्यात आले.

बैठकीत इमारतींच्या पार्किंगसाठी राखीव असलेल्या जागांचा अनधिकृत व्यावसायिक वापर हा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. पार्किंगसाठी मंजूर केलेल्या जागांचा इतर व्यावसायिक कारणांसाठी वापर होत असल्याच्या प्रकरणांचा आढावा घेण्यात आला.

या प्रकरणांमध्ये बांधकाम परवानगी विभागाचे कार्यकारी अभियंते आणि उपअभियंते यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधून या आठवड्यात आवश्यक कारवाई पूर्ण करावी, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी दिले.

महापालिकेच्या भूखंडांवरील अतिक्रमणे हटविणे, पदपथ मोकळे करणे, अनधिकृत बांधकामांची पाहणी करणे आणि पार्किंगच्या जागांचा गैरवापर रोखणे या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories