पिंपरी | १८ नोव्हेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या साप्ताहिक बैठकीत शहरातील पायाभूत सुविधा, रस्ते विकास, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि सांस्कृतिक उपक्रमांशी संबंधित विविध प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दुपारी अडीच वाजता महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात ही बैठक पार पडली.
बैठकीत चऱ्होली, वडमुखवाडी, चोविसावाडी, मोशी, डुडुळगाव, दिघी-बोपखेल, भोसरी, जाधववाडी, कुदळवाडी आणि बोऱ्हाडेवाडीसह विविध परिसरांतील रस्त्यांचे डांबरीकरण, दुरुस्ती, पदपथ, नालेसफाई आणि पावसाळी गटारांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. दिघी-आळंदी रस्त्यावरील ग्रेड सेपरेटर, सबवे, उड्डाणपूल तसेच एम्पायर इस्टेट उड्डाणपूल आणि नाशिक फाटा ते वाकड मार्गावरील स्थापत्यविषयक दुरुस्तीच्या कामांनाही मान्यता देण्यात आली.
पवना थेट जलवाहिनी, ड्रेनेज मास्टर प्लॅन, सांडपाणी पुनर्वापर, एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन आणि मोशी रुग्णालय यांसारख्या मोठ्या प्रकल्पांसाठी केंद्र शासनाच्या अर्बन चॅलेंज फंडासह इतर वित्तीय स्रोतांतून निधी उभारण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. यासाठी स्वतंत्र निधी उभारणी समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव महापालिका सभेकडे शिफारस करण्यासही मान्यता देण्यात आली.
महिला सक्षमीकरण योजनेंतर्गत शहरातील महिला आणि मुलींना ५७ विविध विषयांचे मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यास प्रशासकीय व वित्तीय मंजुरी देण्यात आली. यामध्ये डिजिटल मार्केटिंग, फॅशन डिझायनिंग, डेटा ॲनालिसिस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, फूड प्रोसेसिंग आणि ब्युटी व वेलनेससारख्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. झोपडपट्ट्यांमधील सेवाशुल्क बिलांचे वाटप आणि मोबाईल ॲपद्वारे माहिती अद्ययावत करण्याचे काम महिला बचतगटांमार्फत करण्यासही मान्यता देण्यात आली.
शिक्षण विभागांतर्गत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, एनएमएमएस आणि नवोदय परीक्षांच्या सराव पुस्तकांच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली. तसेच इयत्ता पाचवी आणि नववीतील इच्छुक विद्यार्थ्यांना पालकांच्या संमतीने सूर्यनमस्कार व भगवद्गीता प्रशिक्षण देण्याच्या उपक्रमालाही मान्यता मिळाली. महापालिकेच्या १०५ शाळांमधील सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांपैकी पहिल्या टप्प्यात एक हजार विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याचे नियोजन आहे.
आरोग्य सुविधांमध्ये यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासाठी कॉटरी मशीन खरेदी, रंगरंगोटी आणि भोसरी रुग्णालयातील दुरुस्तीच्या कामांना मंजुरी देण्यात आली. सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती, स्वच्छतेसाठी मनुष्यबळ आणि आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यासही मान्यता देण्यात आली.
सांस्कृतिक उपक्रमांतर्गत २१ ते २४ नोव्हेंबरदरम्यान ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात होणाऱ्या ‘रंगानुभूती : पूर्वरंग ते उत्तररंग’ प्रयोग कला महोत्सवासाठी २४ लाख ८५ हजार रुपयांच्या अंदाजित खर्चाला मंजुरी देण्यात आली. सार्वजनिक ग्रंथालयांच्या संचालन करारांना मुदतवाढ देण्यासह प्रधानमंत्री आवास योजना शहरी २.० साठी सल्लागार एजन्सी नियुक्त करण्याच्या प्रस्तावालाही मान्यता मिळाली.
दरम्यान, स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये पिंपरी-चिंचवडची महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून निवड झाल्याबद्दल स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या हस्ते महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्थायी समिती सदस्य, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे आणि उपायुक्त डॉ. प्रदीप जंगम उपस्थित होते.