दुर्गाटेकडी परिसरात बिबट्याचा वावर, वनविभागाकडून शोध सुरु, नागरीकांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना
May 06 2026
72
दुर्गाटेकडी परिसरात बिबट्याचा वावर, वनविभागाकडून शोध सुरु, नागरीकांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना
पिंपरी, ता. ६ - दुर्गाटेकडी आणि आसपासच्या परिसरात बिबट्या वावरत असल्याचे सीसीटिव्ही कॅमेऱ्यांत दिसून आले आहे. त्यामुळे वनविभागाने बिबट्याची शोधमोहिम सुरु केली आहे. नागरीकांनी सावधगिरी बाळगावी, विशेषतः रात्रीच्या वेळी घराबाहेर पडू नये, लहान मुलांना एकटे सोडू नये तसेच पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.
दुर्गाटेकडी परिसरातील बिबट्याचा मुक्तसंचार सीसीटिव्हीमध्ये कैद झाल्याने दुर्गाटेकडी, ॲम्युनिशन फॅक्टरी, रावेत, म्हस्के वस्ती या भागात वनविभागाची विशेष शोधपथके विविध भागांत पाठवण्यात आली. सध्या वनविभागाकडून या भागात गस्त वाढवण्यात आली असून, बिबट्याला सुरक्षितरीत्या जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
परिसरात संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ वनविभाग किंवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असे वनविभागाने सांगितले आहे.