मुंबईतील 'मराठी भाषा भवन' डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन - डॉ. उदय सामंत
पुणे, ता. १० - मरीन ड्राइव्ह येथे उभारण्यात येत असलेले 'मराठी भाषा भवन' डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती मंत्री डॉ. उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
मुंबईत मरीन ड्राइव्ह येथे उभारण्यात येणाऱ्या सुसज्ज अशा ‘मराठी भाषा भवन’च्या सुरू असलेल्या कामाची पाहणी मंत्री डॉ. सामंत यांनी केली. यावेळी आमदार प्रकाश सुर्वे, मराठी भाषा विभागाचे सह सचिव डॉ.नामदेव भोसले, संचालक अरुण गीते, संचालक रूपेंद्र मोरे, विश्वकोशचे सचिव देवरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता फेगडे आदी उपस्थित होते.
डॉ. सामंत म्हणाले, ''मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तिच्या संवर्धनासाठी आणि मराठीचे विविध पैलू जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य शासन विविध उपक्रम राबवत असून मरीन ड्राइव्ह येथे उभारण्यात येत असलेले मराठी भाषा भवन डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.''
मराठी भाषा भवन मरीन ड्राईव्हच्या समोर साकारले जाणार आहे. हे भवन तळमजला अधिक सात मजली असणार आहे. या भवनामध्ये खुले सार्वजनिक मंच (Open public deck), २०० आसन क्षमतेचे बहुउद्देशीय सभागृह, १४५ क्षमतेचे ॲम्फीथिएटर आणि चार मजल्यांवर प्रदर्शन दालन (Exhibition space) असणार आहे.