चाकण–निगडी मेट्रोत आळंदी स्थानकाचा समावेश करा; महापौर रवि लांडगे यांची मागणी

चाकण–निगडी मेट्रोत आळंदी स्थानकाचा समावेश करा; महापौर रवि लांडगे यांची मागणी

पिंपरी | 9 सप्टेंबर 2026 : पुणे येथे आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीच्या बैठकीत पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगे यांनी शहरातील सार्वजनिक वाहतूक, नदी प्रदूषण, पाणीपुरवठा आणि पायाभूत सुविधांशी संबंधित विविध प्रश्न मांडले. हे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने आवश्यक सहकार्य करावे, अशी मागणी त्यांनी केली.

केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री तथा दिशा समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. प्रस्तावित चाकण–निगडी मेट्रो मार्गिकेमध्ये आळंदी स्थानकाचा समावेश करण्याचा मुद्दा महापौर लांडगे यांनी प्राधान्याने उपस्थित केला.

आळंदीचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व, शहरात येणाऱ्या भाविकांची संख्या तसेच भविष्यातील वाहतुकीची गरज लक्षात घेता आळंदीला मेट्रोची सुविधा मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रस्तावासाठी आवश्यक परवानग्या आणि केंद्र शासनाचा निधी मिळवण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी विशेष पाठपुरावा करावा, अशी विनंतीही त्यांनी केली.

दिशा समितीसमोर सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, भक्ती-शक्ती–मुकाई चौक–वाकड–नाशिक फाटा–वल्लभनगर–चाकण ही प्रस्तावित मेट्रो मार्गिका 45.29 किलोमीटर लांबीची असून, त्यावर 34 स्थानके प्रस्तावित आहेत.

बैठकीत इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. नदीक्षेत्राशी संबंधित महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय यंत्रणा आणि संबंधित प्राधिकरणांनी परस्पर समन्वयातून कालबद्ध कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी महापौरांनी केली. प्रदूषणाची कारणे निश्चित करून सांडपाणी प्रक्रिया, प्रदूषण नियंत्रण आणि नदी संवर्धनाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना द्याव्यात, असेही त्यांनी नमूद केले.

पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणीही त्यांनी केली. प्रकल्पाशी संबंधित प्रलंबित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी सर्व संबंधित घटकांची संयुक्त बैठक घेऊन पुढील कार्यवाही निश्चित करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.

याशिवाय प्रधानमंत्री आवास योजना, अमृत 2.0, स्मार्ट सिटी मिशन, पीएम स्वनिधी, राष्ट्रीय आरोग्य अभियान, समग्र शिक्षा आणि राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम अशा विविध केंद्र पुरस्कृत योजनांचाही महापौरांनी आढावा घेतला. या योजनांमधील प्रलंबित कामांना गती देऊन शहराला अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनामध्ये समन्वय साधण्याची भूमिका त्यांनी मांडली.

महापौर लांडगे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीच्या सूचना दिल्या. शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी केंद्र व राज्य शासनाकडे प्रलंबित प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे महापौर लांडगे यांनी सांगितले.

बैठकीला पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे, जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे, आमदार हेमंत रासने, बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे, शंकर मांडेकर, विविध नगरपालिकांचे नगराध्यक्ष आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories