'मिसिंग लिंक' हा भारतीय अभियांत्रिकी कौशल्याचा जागतिक स्तरावरील अजोड नमुना - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
'मिसिंग लिंक' हा भारतीय अभियांत्रिकी कौशल्याचा जागतिक स्तरावरील अजोड नमुना - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र दिनी 'मिसिंग लिंक'चे लोकार्पण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती
पुणे, ता. २ - "मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील 'मिसिंग लिंक' हा केवळ एक रस्ता नसून भारतीय अभियांत्रिकी कौशल्याचा जागतिक स्तरावरील अजोड नमुना आहे. या प्रकल्पास मिसिंग लिंक पेक्षा 'कनेक्टिंग लिंक' संबोधणे जास्त संयुक्तिक आहे. या प्रकल्पामुळे केवळ प्रवासाचा वेळच वाचणार नाही, तर तो राज्याच्या अर्थव्यवस्थेला ७० हजार कोटींची गती देणारा 'इकॉनॉमिक मल्टिप्लायर' ठरेल.", असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता. १) महाराष्ट्र्र दिनी या प्रकल्पाच्या लोकार्पणानंतर सांगितले.
या प्रकल्पाच्या लोकार्पणानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाच्या तांत्रिक आणि सुरक्षिततेच्या पैलूंवर विशेष प्रकाश टाकला. मुख्यंत्री फडणवीस म्हणाले, ''अतिशय कठीण भौगोलिक परिस्थितीत, दऱ्याखोऱ्यांत आणि जंगलांमध्ये यंत्रसामुग्री नेऊन हे काम पूर्ण करणे मोठे आव्हान होते, या 'कनेक्टिंग लिंक'मुळे मुंबई-पुणे हा नॉलेज आणि टेक्नॉलॉजी कॉरिडॉर अधिक सक्षम होऊन राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळेल.'' मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाच्या कामात योगदान देणाऱ्या सात देशांतील तज्ज्ञ संस्थांचे आणि कंपन्यांचे आभार मानले. कामगार दिनाचे औचित्य साधत त्यांनी या प्रकल्पासाठी घाम गाळणाऱ्या सर्व कामगारांचे आणि एमएसआरडीसीच्या चमूचे कौतुक केले.

या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डिकर, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर पाटणकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र डॉ.संजय दराडे, जिल्हाधिकारी किशन जावळे, एमएसआरडीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक आचल दलाल, सहव्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील, एमएसआरडीसीचे इतर अधिकारी तसेच या प्रकल्पांतर्गत बोगद्याच्या बांधकामातील सहभागी नवयुगा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिसिंग लिंक या प्रकल्पाच्या यशामध्ये सर्व स्तरावरील योगदानाचा आवर्जून उल्लेख केला. हा प्रकल्प म्हणजे केवळ एका व्यक्तीचे यश नसून, ज्या-ज्या हातांनी यात हातभार लावला त्या सर्वांचे त्यांनी मनापासून अभिनंदन केले. विशेषतः कोविडच्या काळात जेव्हा अनेक आव्हाने समोर होती, तेव्हा एमएसआरडीसी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अधिकाऱ्यांनी बॅकलॉग भरून काढत हे काम पूर्ण केल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. एकेकाळी हा प्रकल्प रद्द करण्याचा किंवा न होण्याचा विचार सुरू होता, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते आव्हान स्वीकारून अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आणि कामाला सुरुवात केली. शिंदे यांनी आठवण करून दिली की, प्रकल्पाच्या भूमिपूजनावेळी ते स्वतः एमएसआरडीसी मंत्री होते आणि आज लोकार्पणाच्या वेळीही हे खाते त्यांच्याकडेच आहे, हा एक दुर्मिळ योगायोग आहे, असे ते म्हणाले. महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात केवळ ७-८ तासांत पोहोचता यावे, यासाठी सरकार 'अॅक्सेस कंट्रोल ग्रीड'वर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. समृद्धी महामार्गामुळे नागपूर-मुंबई प्रवास जसा सुखकर झाला, तसाच आता पुणे प्रवासही सुसाट आणि सुरक्षित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मिसिंग लिंक या प्रकल्पाच्या जागतिक विक्रमाबद्दल अभिमान व्यक्त केला. या प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेला २३.५ मीटर रुंदीचा बोगदा हा जगातील सर्वात रुंद बोगदा ठरला असून, त्याची 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स' मध्ये नोंद झाली आहे, ही बाब महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक आणि अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रकल्प म्हणजे केवळ दोन शहरांमधील अंतर कमी करणारा रस्ता नसून महाराष्ट्राच्या वेगवान प्रगतीची नांदी असल्याचे सांगत, त्यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या महामार्गाचा आज सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा टप्पा गाठला गेल्याची भावना व्यक्त केली. या प्रकल्पाच्या नियोजनात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही मोठे योगदान असून त्यांनी अर्थसंकल्पात केलेली घोषणा आणि वेळोवेळी घेतलेला आढावा यामुळे हा प्रकल्प मार्गी लागल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.