मोई | २८ नोव्हेंबर २०२६ : घरगुती वादात बोलण्यावरून एका व्यक्तीला सिमेंटच्या गट्टूने आणि लाकडी बांबूने डोक्यात मारहाण केल्याची घटना खेड तालुक्यातील मोई येथे घडली आहे. गुरुवारी (२६ नोव्हेंबर) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास फळके वस्तीतील जय गणेश सोसायटीमध्ये हा प्रकार घडला.
या प्रकरणी एका महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार सनी तात्या शिंदे (वय २१), नारायण पंढरी इंगळे (वय ३९) आणि एका महिलेसह तीनजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपी जय गणेश सोसायटी, फळके वस्ती, मोई येथील रहिवासी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या घरात झालेला घरगुती वाद सोडविण्यासाठी तिचे आई-वडील आले होते. वाद मिटवून ते परत जात असताना तात्या शिंदे यांनी तक्रारदार महिलेच्या वडिलांशी घरगुती वादासंदर्भात बोलणे केले. हे ऐकल्यानंतर तक्रारदाराचे पती सुमीत यांनी हा आमचा घरगुती वाद असून, तुम्ही मध्ये बोलू नका, असे तात्या शिंदे यांना सांगितले.
हे ऐकून तात्या शिंदे यांचा मुलगा सनी शिंदे रागाने घराबाहेर आला. माझ्या वडिलांना का बोलतोस, असे म्हणत त्याने सुमीत यांना शिवीगाळ केली. त्यानंतर जवळच पडलेल्या सिमेंटच्या गट्टूने आणि लाकडी बांबूने त्यांच्या डोक्यात मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
याशिवाय महिला आरोपीने तक्रारदार महिलेला अश्लील शिवीगाळ केली, तर नारायण इंगळे याने तक्रारदार महिलेच्या वडिलांना शिवीगाळ करून मारहाण करण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी २७ नोव्हेंबर रोजी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार जाधव पुढील तपास करत आहेत.