कसं घडलं पिंपरी-चिंचवड शहर? विजय जगतापांनी उलगडला इतिहास

कसं घडलं पिंपरी-चिंचवड शहर? विजय जगतापांनी उलगडला इतिहास

थेरगाव | २८ नोव्हेंबर २०२६ : मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांना जोडणारे महामार्ग, रेल्वेमार्ग आणि हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (एचए) कंपनी यांचे पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान आहे. एचए कंपनीमुळे पिंपरी-चिंचवडला देशाच्या नकाशावर स्वतंत्र ओळख मिळाली आणि १९५० नंतर शहराच्या विकासाचा प्रवास वेगवान झाला, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक विजय जगताप यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या थेरगाव येथील पीएम श्री माध्यमिक विद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘असं घडलं पिंपरी-चिंचवड शहर’ या विषयावर बोलताना विजय जगताप यांनी विद्यार्थ्यांसमोर शहराच्या ऐतिहासिक वारशापासून ते आधुनिक औद्योगिक शहराच्या निर्मितीपर्यंतचा प्रवास मांडला.

पिंपरी-चिंचवडची ओळख केवळ औद्योगिक शहरापुरती मर्यादित नसून, शहराला समृद्ध प्राचीन इतिहासाची पार्श्वभूमी आहे. स्वातंत्र्यपूर्व चळवळ, क्रांतिकारकांचे बलिदान, परिसरातील गावांच्या ऐतिहासिक परंपरा, धार्मिक स्थळे, ग्रामदैवते आणि संतपरंपरा यांचे शहराच्या जडणघडणीत महत्त्वाचे स्थान आहे. देहू आणि आळंदी या दोन्ही तीर्थक्षेत्रांचे सान्निध्य लाभलेले हे राज्यातील एकमेव शहर असल्याचे जगताप यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर अवघ्या दहा वर्षांत पिंपरी-चिंचवडमध्ये नगरपालिका अस्तित्वात आली. त्यानंतर अवघ्या बारा वर्षांत नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले. अत्यंत कमी कालावधीत झपाट्याने विकसित झालेले देशातील दुसरे शहर म्हणून पिंपरी-चिंचवडची ओळख असल्याचेही त्यांनी नमूद केले.

प्रभारी उपशिक्षणाधिकारी तथा विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबासाहेब राठोड यांनी पीएम श्री योजनेअंतर्गत शाळेला मिळालेल्या सन्मानाची माहिती दिली. विद्यार्थ्यांना शहराच्या इतिहासाची ओळख करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानामागील भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.

कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इस्माईल मुल्ला यांनी केले, तर रेश्मा जगताप यांनी आभार मानले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories