पिंपरी | २८ नोव्हेंबर २०२६ : स्त्रीशिक्षणासाठीचा संघर्ष आणि सामाजिक समतेसाठी उभारलेली चळवळ यांची आठवण पिंपरीत पोवाड्यांच्या माध्यमातून जागवण्यात आली. महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेने त्यांच्या कार्याचे स्मरण करत त्यांना अभिवादन केले.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील महात्मा फुले यांच्या प्रतिमेला उपमहापौर शर्मिला बाबर यांनी पुष्पहार अर्पण केला. पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकातील महात्मा फुले यांच्या अर्धपुतळ्यालाही त्यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दीनिमित्त महापालिकेने विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याअंतर्गत पिंपरीत झालेल्या कार्यक्रमात शाहीर सुरेश सूर्यवंशी आसंगीकर यांनी महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील विविध प्रसंग पोवाड्यांतून सादर केले.
शिक्षणाचा प्रसार, स्त्रीशिक्षण आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी महात्मा फुले यांनी काम केले. समाजातील अनिष्ट रूढींना विरोध करत त्यांनी शिक्षणातून परिवर्तन घडवण्यावर भर दिला. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा विचार समाजापर्यंत पोहोचवला. या कार्याला स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात उजाळा देण्यात आला.
यावेळी नगरसदस्या सुप्रिया चांदगुडे, नगरसदस्य कुणाल वाव्हळकर, उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.