पिंपरी-चिंचवडमध्ये जागतिक रोल बॉलची तयारी ; भारतीय संघाचा कसून सराव

पिंपरी-चिंचवडमध्ये जागतिक रोल बॉलची तयारी ; भारतीय संघाचा कसून सराव

पिंपरी-चिंचवड | २८ नोव्हेंबर २०२६ : देशाच्या विविध भागांतून निवड झालेले युवा रोल बॉलपटू सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये एकत्र सराव करत आहेत. इंदूरमध्ये होणाऱ्या जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यापूर्वी मुला-मुलींच्या संघांना या शिबिरात प्रशिक्षकांचे मार्गदर्शन मिळत आहे.

रोल बॉल फेडरेशन ऑफ इंडिया आणि स्केट मास्टर स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. हेडगेवार स्केटिंग रोल बॉल मैदानावर हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिराला २५ नोव्हेंबरला सुरुवात झाली, तर २६ नोव्हेंबरला त्याचे औपचारिक उद्घाटन झाले. यात भारताच्या १७ वर्षांखालील मुला-मुलींच्या संघांतील खेळाडू सहभागी झाले आहेत.

स्केट मास्टर स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल मासुळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदूरमधील जागतिक स्पर्धेत २२ देशांचे संघ सहभागी होणार आहेत. त्या स्पर्धेच्या दृष्टीने शिबिरात विशेष सरावावर भर दिला जात आहे. शिबिर पूर्ण झाल्यानंतर भारतीय संघ ४ डिसेंबरला इंदूरकडे रवाना होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुलींच्या संघाच्या मुख्य प्रशिक्षिका म्हणून अपर्णा महाडिक, तर सहाय्यक प्रशिक्षिका म्हणून विनिता गुंड यांची नियुक्ती झाली आहे. मुलांच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक राजशेखर राजा असून अंकित रावळ सहाय्यक प्रशिक्षक आहेत. संघ व्यवस्थापनाची जबाबदारी महेश उबे आणि शैलेंद्र पोतनीस यांच्याकडे आहे.

शिबिराच्या उद्घाटनाला राहुल भोसले, सिद्धार्थ बनसोडे, सारिका मासुळकर, वैशाली घोडेकर, रोल बॉलचे जनक राजू दाभाडे, अर्जुन पुरस्कार विजेते गोपाल देवांग, राजन नायर, प्रशांत कापसे आणि भारतीय रोल बॉल फेडरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी चेतन भांडवलकर उपस्थित होते. त्यांनी खेळाडूंशी संवाद साधून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू असलेल्या या राष्ट्रीय सराव शिबिरामुळे शहराच्या क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. आगामी जागतिक स्पर्धेत भारतीय संघाला किती पदके मिळतील याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories