तळेगाव दाभाडे | २८ नोव्हेंबर २०२६ : पिंपरी-चिचंवडमधील तळेगाव दाभाडेत संजीवनी हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर जुन्या वादातून झालेल्या मारहाणीत एक ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाला. या प्रकरणी त्यांच्या पत्नीने तळेगाव दाभाडे पोलिसांकडे तक्रार दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ नोव्हेंबरला सायंकाळी ६.१५ च्या सुमारास लक्ष्मीबाग कॉलनीतील संजीवनी रुग्णालयासमोर हा प्रकार घडला. अनिल नामदेव चव्हाण (वय ६२) तेथे आले असता मनिष गुलाब रिकामे (वय ३३, रा. लक्ष्मीबाग कॉलनी, तळेगाव दाभाडे) याने जुन्या भांडणावरून चव्हाण यांना शिवीगाळ केली.
त्यानंतर त्याने चव्हाण यांच्यावर धारदार शस्त्राने डोक्यावर व शरीवर सपासप वार करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. तुझ्या घरातील सर्वांना खपवतो असे म्हणत, चव्हाण यांच्या कुटुंबीयांनाही जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी चव्हाण यांच्या पत्नीने तक्रार दाखल केली.
तळेगाव दाभाडे पोलिसांनी आरोपी मनिष गुलाब रिकामे याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१), ११५(२), ३५२ आणि ३५१(२) नुसार गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक खामगळ तपास करत आहेत.