पिंपरीत महात्मा फुलेंना काँग्रेसचे अभिवादन; समतेसाठी लढण्याची शपथ

पिंपरीत महात्मा फुलेंना काँग्रेसचे अभिवादन; समतेसाठी लढण्याची शपथ

पिंपरी | २८ नोव्हेंबर २०२६ : मुलींच्या शिक्षणासाठी काम करण्यापासून ते जातिभेदाविरुद्ध उभे राहण्यापर्यंत, महात्मा फुले यांच्या विचारांना कृतीत आणण्याचा निर्धार पिंपरीत करण्यात आला. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहर काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सामूहिक प्रतिज्ञा घेतली.

पिंपरी चौकातील मध्यवर्ती काँग्रेस कार्यालयात पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

महात्मा फुले यांनी शिक्षण, स्त्री-पुरुष समानता आणि सामाजिक न्यायासाठी केलेले काम आजही समाजाला दिशा देते, असे बनसोडे यांनी सांगितले. वंचित आणि बहुजन घटकांच्या हक्कांसाठी फुलेंनी दिलेला लढा सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरला. फुलेंच्या विचारांत इतिहासाप्रमाणेच वर्तमान बदलण्याची ताकद आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या वेळी उपस्थितांनी जातिभेद, अस्पृश्यता, अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमतेविरुद्ध काम करण्याची शपथ घेतली. मुलींचे शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्पही त्यांनी केला. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या संविधानिक मूल्यांचे रक्षण करण्याचा निर्धार प्रतिज्ञेतून व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाला प्रदेश काँग्रेसचे माजी सरचिटणीस केदार पाटील साळुंखे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहीतुले, सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष कुणाल भोसले, हिराचंद जाधव, संदीप शिंदे, देवदत्त रानवडे, रामकिसन माने, मेहबूब इनामदार, नबीलाल मुल्ला, पुरुषोत्तम राऊत, मंगेश चव्हाण, रवींद्र कुंभार, रावसाहेब गंगाधरे, महबूब शेख, राजेश परदेशी आणि प्रवीण कांबळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories