मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी उपअग्निशमन केंद्र अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांचे निलंबन
पिंपरी, ता. २९ जुलै २०२६ - मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी अग्निशामक विभागातील उपअग्निशमन केंद्र अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांना मंगळवारी (ता. २८) निलंबित करण्यात आले. कोसळलेल्या इमारतीला अग्निशमन ना हरकत दाखला (एनओसी) देताना हलगर्जीपणा केल्याने चिपाडे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. त्याच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हा आदेश जारी केला आहे.
या प्रकरणी महापालिकेने यापूर्वी चिपाडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागविला होता. त्यांनी सादर केलेला खुलासा असमाधानकारक आढळल्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियमांनुसार त्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले.
चिपाडे यांनी प्रशासनिक इमारतीची प्रत्यक्ष स्थळ पाहणी न करता आणि मंजूर आराखड्याची पडताळणी न करताच अंतिम अग्निसुरक्षा ना हरकत प्रमाणपत्र (फायर एनओसी) दिल्याचा आरोप आहे. प्रत्यक्ष उभारण्यात आलेले बांधकाम आणि मंजूर आराखड्यात मोठी तफावत असतानाही त्यांनी याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली नाही. या हलगर्जीपणामुळे अतिरिक्त अनधिकृत बांधकामावर वेळेत कारवाई झाली नाही. परिणामी ८ जुलै रोजी कचऱ्याचा ढिगारा कोसळून इमारत पडल्याने नऊ कामगारांचा मृत्यू झाला, आदेशात नमूद केले आहे.
या दुर्घटनेप्रकरणी यापूर्वी पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांना निलंबित करण्यात आले असून, त्यांचीही विभागीय चौकशी सुरू आहे.
- निलंबन कारवाई, suspension action, विभागीय चौकशी, departmental inquir
- अग्निशमन विभाग, fire department, उपअग्निशमन केंद्र अधिकारी, Deputy Fire Station Officer, ऋषिकांत चिपाडे, Rishikant Chipade
- PCMC, कचरा डेपो दुर्घटना प्रकरण, waste depot accident case
- मोशी कचरा डेपो दुर्घटना, मोशी garbage depot accident