सवलतीच्या दरात 'एसटी' प्रवासासाठी १ ऑगस्टपासून महिला, ज्येष्ठ नागरिक व अमृत ज्येष्ठ नागरिकांना 'नॅशनल कॉमन मोबिलीटी स्मार्ट कार्ड' बंधनकारक
सवलतीच्या दरात 'एसटी' प्रवासासाठी १ ऑगस्टपासून महिला, ज्येष्ठ नागरिक व अमृत ज्येष्ठ नागरिकांना 'नॅशनल कॉमन मोबिलीटी स्मार्ट कार्ड' बंधनकारक
पुणे, ता. १२ - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी 'नॅशनल कॉमन मोबिलीटी स्मार्ट कार्ड (NCMC)' बंधनकारक करण्यात येणार आहे.
याबाबत सविस्तर माहिती देताना राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, यापूर्वी बनावट ओळखपत्रे आणि कागदपत्रांचा वापर करून सवलतीचा दुरुपयोग होत असल्याचे प्रकार घडले होते. त्यामुळे 'नॅशनल कॉमन मोबिलीटी स्मार्ट कार्ड (NCMC)' बंधनकारक करण्यामागे विविध सवलत योजना सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने राबवणे हा मुख्य उद्देश आहे. पुढे, इतर सवलत श्रेणींमध्येही 'नॅशनल कॉमन मोबिलीटी स्मार्ट कार्ड (NCMC)'टप्प्याटप्याने लागू केले जाईल. सध्या महामंडळ विद्यार्थी, दिव्यांग, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि पुरस्कार विजेते अशा सुमारे ३५ वेगवेगळ्या श्रेणींतील प्रवाशांना भाडे सवलत प्रदान करत आहे.
'नॅशनल कॉमन मोबिलीटी स्मार्ट कार्ड (NCMC)'प्रवासी बस स्थानकांवर १९९ रुपये भरून मिळेल. कार्डची मुदत संपल्यास नवीन कार्ड (रिप्लेसमेंट) घेण्यासाठी १४९ रुपये शुल्क आकारले जाईल. कार्डमध्ये किमान १०० रुपयांची शिल्लक ठेवणे बंधनकारक आहे. कार्ड रिचार्ज करण्यासाठी ईटीआयएम मशीन्स, महामंडळाचे अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल अॅप्लिकेशन किंवा अधिकृत एजंट्सचा वापर करायचा आहे. त्यासाठी महामंडळाने ४,००० हून अधिक अधिकृत एजंट्सची नियुक्ती केली आहे. निर्धारित शुल्कापेक्षा जास्त पैसे घेणाऱ्या कोणत्याही वितरण केंद्रांवर कठोर कारवाई केली जाईल आणि अशा एजंट्सचे परवाने रद्द करण्यात येतील. महाराष्ट्रात आतापर्यंत ५१ लाखांपेक्षा अधिक प्रवाशांनी एनसीएमसी कार्डासाठी नोंदणी पूर्ण केली आहे. यातील सुमारे २५ लाख कार्डे सक्रिय (अॅक्टिव्हेट) झाली आहेत.
विद्यार्थ्यांना त्यांच्या 'सरल' ओळख क्रमांकाशी जोडलेली कार्ड उपलब्ध होतील. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना आधार कार्डशी लिंक केलेली कार्ड मिळतील. दिव्यांग व्यक्तींसाठी 'युनिक डिसॅबिलिटी आयडी' (यूडीआयडी) शी संलग्न कार्ड दिली जातील. तर मान्यताप्राप्त पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक आणि राज्य पुरस्कार विजेत्यांना संबंधित विभागीय कार्यालये किंवा नियुक्त डेपोमधून ही कार्ड मिळतील. प्रवाशांनी 'नॅशनल कॉमन मोबिलीटी स्मार्ट कार्ड'ची नोंदणी वेळेक पूर्ण करावी करण्याचे आणि कार्ड सक्रिय करावे, असे आवाहन प्रताप सरनईक यांनी केले आहे.