हिंजवडीतून ७८ हजार ५०० रुपयांचा तर देहूरोडमधून १२ हजारांचा गांजा जप्त, आरोपींना अटक
पिंपरी, ता. ५ - हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बोडकेवाडी-माण येथे ७८ हजार ५०० रुपयांचा गांजा पोलिसांनी सोमवारी (ता. ४) ५७ वर्षीय इसमाकडून जप्त केला आहे. या इसमाला पोलिसांनी अटक केली आहे. तर देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत १२ हजार १०० रुपयांचा गांजा पोलिसांनी ४२ वर्षीय इसमाकडून जप्त केला आहे. गांजा बाळगणाऱ्या दोन्ही इसमांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याविरोधात एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचा पश्चिम बंगाल इथला असलेला आरोपी संजय विश्वनाथ राय (वय ५७ वर्षे, रा. बोडकेवाडी) याने एकूण ७८,५००/- रुपये किंमतीचा १५७१ ग्रॅम गांजा विक्रीकरीता बेकायदेशीररित्या बाळगला होता. बोडकेवाडी परिसरातून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत आरोपी अनिल जगन्नाथ बोरसे (वय ४२ वर्षे, रा. देहुरोड) याने एकूण १२,१००/- रुपये किंमतीचा २४२ ग्रॅम वजनाचा गांजा विक्रीसाठी बेकारयेशीरपणे बाळगला होता. त्याच्याकडून गांजासह व एक मोबाईल हँडसेट, वजनकाटा व पारदर्शक प्लॅस्टीकच्या रिकाम्या पिशव्या असा एकूण २२ हजार ३५०/- रुपये किंमतीचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. हा गांजा हा त्याने कोणाकडून एका महिलेकडून विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. आरोपी बोरसे व महिला आरोपीवर पोलिसांनी देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी बोरसे याला अटक केली आहे.