पिंपरी-चिंचवड | २८ ऑक्टोबर २०२६ : नवीन दुचाकी खरेदी करणाऱ्या आणि आपल्या वाहनासाठी आकर्षक किंवा पसंतीचा क्रमांक मिळवू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) दुचाकी वाहनांसाठी लवकरच ‘NW’ ही नवीन नोंदणी मालिका सुरू करण्यात येणार आहे. या मालिकेतील आकर्षक क्रमांक आरक्षित करण्यासाठी इच्छुक वाहनधारकांना अर्ज करण्याचे आवाहन आरटीओ प्रशासनाने केले आहे.
आरटीओने दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २.३० वाजेपर्यंत आकर्षक आणि पसंतीचे नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. यासाठी संबंधित अर्जदारांना विहित शुल्काच्या तीनपट शुल्क भरावे लागणार आहे.
दुचाकी मालिकेतील उर्वरित आकर्षक क्रमांकांसाठी २ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २.३० वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
चारचाकी वाहनांसाठी अर्जदारांची यादी २ नोव्हेंबर रोजी, तर दुचाकी वाहनांसाठी अर्जदारांची यादी ३ नोव्हेंबर रोजी आरटीओ कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केली जाणार आहे.
एकाच आकर्षक क्रमांकासाठी अधिक रकमेची बोली लावू इच्छिणाऱ्या अर्जदारांनी संबंधित दिवशी दुपारी २.३० वाजेपर्यंत सीलबंद पाकिटात डिमांड ड्राफ्ट जमा करणे आवश्यक आहे. चारचाकी वाहनांसाठी ही प्रक्रिया २ नोव्हेंबरला, तर दुचाकी वाहनांसाठी ३ नोव्हेंबरला होईल. त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता बोली प्रक्रिया पार पडणार आहे.
अर्ज करताना डिमांड ड्राफ्ट, पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, फोटो ओळखपत्र आणि पॅनकार्ड यांच्या साक्षांकित प्रती सादर कराव्या लागणार आहेत. तसेच आधारकार्डशी संलग्न असलेला मोबाईल क्रमांक देणेही बंधनकारक आहे.
डिमांड ड्राफ्ट ‘DY.R.T.O. PIMPRI CHINCHWAD’ यांच्या नावे काढावा लागणार असून, तो पुणे येथील राष्ट्रीयीकृत किंवा अनुसूचित बँकेचा असणे आवश्यक आहे.
आरटीओ प्रशासनाने वाहनधारकांसाठी काही महत्त्वाच्या अटीही स्पष्ट केल्या आहेत. एकदा आरक्षित केलेला नोंदणी क्रमांक बदलता येणार नाही. तसेच क्रमांक आरक्षित केल्यापासून १८० दिवसांच्या आत वाहन नोंदणीसाठी सादर करणे आवश्यक आहे.
या कालावधीत वाहन नोंदणीसाठी सादर न केल्यास संबंधित क्रमांकाचे आरक्षण रद्द होईल आणि भरलेले शुल्क शासनाकडे जमा होईल. विशेष म्हणजे, आरक्षणासाठी भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही, असे पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
त्यामुळे आकर्षक वाहन क्रमांक मिळवू इच्छिणाऱ्या नागरिकांनी निर्धारित वेळेत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.