म्हाळुंगे | २८ ऑक्टोबर २०२६ : खेड तालुक्यातील आंबी परिसरातील एका इंजिनिअरिंग कंपनीत काम करताना २२ वर्षीय मजुराच्या डाव्या हाताची चार बोटे तुटल्याची गंभीर घटना समोर आली आहे. मशीन खराब असल्याची माहिती असूनही काम करण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणी उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात कंपनीच्या सुपरवायझरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४.३१ वाजण्याच्या सुमारास घडली.
या प्रकरणी नमन मरकस कन्डुलना (वय २२ वर्षे, व्यवसाय मजुरी, मूळ रा. खरवागढा, थाना जलेडगा पत्ती, आंबा, सिमडेगा; सध्या रा. वाघजाईनगर येथील इंजिनिअरिंग कंपनी, ता. खेड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
वाघजाईनगर येथील इंजिनिअरिंग कंपनीमधील सुपरवायझर कैलास पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, नमन कन्डुलना हे कंपनीमध्ये १०० टन क्षमतेच्या मशीनवर काम करत होते. त्यावेळी मशीनमध्ये जॉब अडकल्याने ते हाताने काढण्याचा प्रयत्न करत होते.
मात्र, अचानक मशीन सुरू झाल्याने मशीनचा रॅम हातावर पडला आणि त्यांच्या डाव्या हाताची चार बोटे तुटली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, संबंधित मशीन खराब असल्याची माहिती त्यांनी सुपरवायझर कैलास पवार यांना दिली होती. मात्र, मशीनची दुरुस्ती करून घेण्याऐवजी त्यांना काम करण्यास भाग पाडण्यात आले.
मशीनमधील बिघाडाकडे दुर्लक्ष करून काम करण्यास सांगितल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०६/२०२६ नोंदविण्यात आला आहे. आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १२५(अ) आणि १२५(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार कारोटे करीत आहेत.