रावेत वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाला नगरसेविका ऐश्वर्या तरस यांचा विरोध

रावेत वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाला नगरसेविका ऐश्वर्या तरस यांचा विरोध

पिंपरी-चिंचवड | २८ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने रावेत परिसरातील सेक्टर २३ मधील सर्व्हे क्रमांक १५५, १५६, १५८ आणि १७७ येथे प्रस्तावित असलेल्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाला नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. मोशी येथील विद्यमान प्रकल्पाच्या समस्या पूर्णपणे सोडवण्यापूर्वी नवीन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेऊ नये, अशी मागणी त्यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनानुसार, महापालिकेमार्फत रावेत येथे नवीन वेस्ट टू एनर्जी प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून तसेच प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन या प्रस्तावाला ठाम विरोध असल्याचे तरस यांनी स्पष्ट केले आहे.

मोशी येथील विद्यमान वेस्ट टू एनर्जी प्रकल्प अपेक्षित क्षमतेने आणि कार्यक्षमतेने सुरू झालेला नाही,  या प्रकल्पातील तांत्रिक अडचणी, कार्यप्रणालीतील त्रुटी, पर्यावरणीय परिणाम आणि कचरा व्यवस्थापनाशी संबंधित प्रश्न अद्याप पूर्णपणे निकाली निघालेले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

अशा परिस्थितीत विद्यमान प्रकल्पातील समस्या दूर न करता दुसरा प्रकल्प उभारण्याचा निर्णय योग्य ठरणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

विशेष म्हणजे, प्रस्तावित प्रकल्पाच्या आजूबाजूचा परिसर संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील ऑर्डनन्स फॅक्टरी, देहूरोड या संवेदनशील क्षेत्राजवळ असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नवीन प्रकल्प उभारण्यापूर्वी संरक्षण विभागाची भूमिका, सुरक्षा मानके आणि संभाव्य धोक्यांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक असल्याचे तरस यांनी म्हटले आहे.

याशिवाय, परिसरात ऐतिहासिक दुर्ग टेकडी, वाढती निवासी वसाहत आणि शैक्षणिक संस्था असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. प्रस्तावित प्रकल्पामुळे वायू प्रदूषण, दुर्गंधी, ध्वनी प्रदूषण आणि वाहतूक कोंडीसारख्या समस्या निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर रावेत येथील प्रस्तावित वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मोशीतील विद्यमान प्रकल्प पूर्ण क्षमतेने, सुरक्षित आणि कार्यक्षम पद्धतीने सुरू झाल्यानंतरच नवीन प्रकल्पाबाबत विचार करावा, असे निवेदनात म्हटले आहे.

तसेच स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी, पर्यावरणतज्ज्ञ आणि संरक्षण विभाग यांच्याशी सविस्तर चर्चा करून पुढील निर्णय घ्यावा. प्रकल्पाचा स्वतंत्र पर्यावरणीय आणि सामाजिक परिणाम अहवाल (EIA) सार्वजनिक करून नागरिकांच्या हरकती व सूचना मागवाव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.

नागरिकांच्या आरोग्य, पर्यावरण आणि सुरक्षिततेचा विचार करून प्रस्तावाचा पुनर्विचार करावा, असे आवाहन नगरसेविका ऐश्वर्या तरस यांनी केले आहे. या मागण्यांचा गांभीर्याने विचार न झाल्यास मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories