'स्वच्छ- हरित पिंपरी-चिंचवड' घडवण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना
'स्वच्छ आणि हरित पिंपरी-चिंचवड' घडवण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना
पिंपरी, ता. १० - ''शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक करण्याच्या उद्देशाने 'स्वच्छ आणि हरित पिंपरी-चिंचवड' ही संकल्पना राबवायची आहे. उपक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाबरोबरच शहर स्वच्छतेवर विशेष भर देण्यात येणार आहे.'', असे महापौर रवी लांडगे यांनी सांगितले. महापालिका प्रशासनाला महापौर लांडगे यांनी शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून लोकसहभागावर आधारित स्वच्छता मोहिमा प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन दिले आहे.
महापौर लांडगे म्हणाले, ''शहराच्या वाढत्या विस्ताराचा विचार करता स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून, ती प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. या अंतर्गत प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 'स्वच्छ रस्ता - स्वच्छ परिसर' स्पर्धा, दर आठवड्याला विशेष स्वच्छता अभियान, शाळा-महाविद्यालयांमध्ये 'स्वच्छता दूत' उपक्रम, अस्वच्छ ठिकाणी वॉल आर्टद्वारे सौंदर्गीकरण, तसेच नागरिकांच्या तक्रारींच्या तातडीच्या निवारणासाठी डिजिटल प्रणाली विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.
मोठ्या उत्सव व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये 'झिरो गार्बेज इव्हेंट' संकल्पना राबविणे, स्वयंसेवी संस्था, गृहनिर्माण संस्था व सीएसआरच्या माध्यमातून उपक्रम सुरू करणे आणि प्रत्येक स्वच्छता कामाचे दस्तऐवजीकरण करणे अपेक्षित आहे.''
'स्वच्छ आणि हरित पिंपरी-चिंचवड' ही केवळ मोहीम नसून, शहराच्या भविष्यासाठीचा उपक्रम आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्या संयुक्त सहभागातून आपण स्वच्छ, हरित आणि आदर्श शहर घडवू, या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी स्वतंत्र कृती आराखडा तयार करून नियमित प्रगती अहवाल सादर करावेत, अशी सूचना महापौर लांडगे यांनी दिली.