क्राइम रिपोर्ट
शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - २८ जुलै २०२६
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 स्वतःचे बॅंक खाते सायबर फसवणुकीसाठी वापरण्यास दिल्याप्रकरणी खातेदारांवर गुन्हा दाखल
▶️ हिंजवडी - सायबर फसवणुकीसाठी स्वतःचे बँक खाते उपलब्ध करून दिल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एका खातेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी पोलिस हवालदार आर. बी. गोडांबे यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ओमकार विष्णू शिरसाट (रा. जि. अहमदनगर) याच्यासह त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने साथीदारांशी संगनमत करुन स्वतःचे खाते सायबर फसवणुकीतील आर्थिक व्यवहारांसाठी वापरण्यास दिले.
फसवणुकीचा हा प्रकार २ जानेवारी २०२६ रोजी हिंजवडीमध्ये घडला आहे. या प्रकरणात कापुरबावडी पोलीस ठाणे (ठाणे शहर) तसेच कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील बसवन बागेवाडी पोलीस ठाणे येथे एनसीसीआरपी (NCCRP) पोर्टलवर तक्रारी नोंद झाल्यानंतर तपासादरम्यान संबंधित बँक खात्याचा वापर सायबर फसवणुकीसाठी झाल्याचे समोर आले. आरोपीविरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. २७) भारतीय न्याय संहिता कलम ११२ (२), ६१ (२), ३१८ (४), ३१७ (२) आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
▶️ तळेगाव दाभाडे - सायबर फसवणुकीतील आर्थिक व्यवहारांसाठी स्वतःचे बँक खाते उपलब्ध करून दिल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी एका खातेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पोलिस शिपाई स्वाती राजाराम पाटील यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव माणिक व्यंकट भताने (रा. जि. बीड) असे आहे.
१८ फेब्रुवारी २०२६ शांताई सिटी, तळेगाव दाभाडे परिसरात हा प्रकार उघडकीस आला. आरोपीने बँकेतील स्वतःचे खाते साथीदारांच्या संगनमताने सायबर फसवणुकीतील आर्थिक व्यवहारांसाठी वापरण्यास दिले होते.
तपासादरम्यान कर्नाटक राज्यातील कोलार ग्रामीण येथे एनसीसीआरपी (NCCRP) पोर्टलवर दाखल झालेल्या तक्रारीतील फसवणुकीच्या ८० हजार रुपये रकमेपैकी रुपये १० हजार तळेगाव दाभाडे येथील एटीएममधून काढण्यात आल्याचे निष्पन्न झाले. आरोपीविरुद्ध तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. २७) भारतीय न्याय संहिता कलम ११२ (२), ६१ (२), ३१७ (२), ३१८ (४) व ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
▶️ तळेगाव एमआयडीसी - सायबर फसवणुकीतील आर्थिक व्यवहारांसाठी स्वतःचे बँक खाते वापरण्यास दिल्याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी एका खातेदारासह अनोळखी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी पोलीस शिपाई पोपट रोहीदास हुलगे यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव सोमनाथ जाधव (रा. ता. मावळ) असून त्याचा अनोळखी साथीदार यात सामील आहे.
आरोपीने स्वतःचे बॅंक खाते सायबर फसवणुकीतील आर्थिक व्यवहारांसाठी वापरण्यास दिले. तपासादरम्यान जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, दिल्ली, कर्नाटक आणि राजस्थानमधील एनसीसीआरपी (NCCRP) पोर्टलवर दाखल सात सायबर फसवणुकीच्या तक्रारींमध्ये संबंधित खात्याचा वापर झाल्याचे निष्पन्न झाले. तसेच फसवणुकीच्या रकमेपैकी ५ हजार रुपये वराळे परिसरातील एटीएममधून काढण्यात आल्याचे तपासात समोर आले.
आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११२ (२), ६१ (२), ३१८ (४), ३१७ (२) व ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 पुनावळ्यात ७१ हजारांचा गांजा जप्त; तरुण अटकेत
पुनावळे गावठाणातील राम मंदिरामागील मोकळ्या जागेत कारवाई करत रावेत पोलिसांनी २३४ ग्रॅम गांजा जप्त केला. या प्रकरणी २२ वर्षीय युवकाला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक (एनडीपीएस) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास सुबोध ढोले (वय २२, रा. पुनावळे गावठाण, ता. हवेली, मूळ रा. नांदेड) हा पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवर विक्रीसाठी गांजा बाळगून असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. रविवारी (ता. २६) सायंकाळी सुमारे ६.५० वाजता राम मंदिरामागील मोकळ्या जागेत कारवाई करण्यात आली. त्यावेळी आरोपीच्या ताब्यातून २३४ ग्रॅम गांजा आणि दुचाकीसह एकूण ७१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलिस शिपाई सौदागर देविदास लामतुरे यांनी फिर्याद दिली असून रावेत पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 तडीपार आरोपीकडून कोयता जप्त; दापोडी पोलिसांची कारवाई
तडीपार आदेशाचा भंग करून पिंपरी-चिंचवड हद्दीत वावरत असलेल्या एका सराईत आरोपीला दापोडी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून विनापरवाना बाळगलेला लोखंडी कोयता जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरशद हनिफ सय्यद (वय २६, रा. कासारवाडी, पुणे) याला पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे शहर पोलीस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलीस हद्दीतून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले होते. मात्र, कोणतीही परवानगी न घेता तो रविवारी (ता. २६) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कासारवाडी येथील गंधर्व गरिमा लॉन्सच्या पाठीमागे, हिराबाई झोपडपट्टीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आढळून आला.
झडतीदरम्यान त्याच्याकडून सुमारे १०० रुपये किमतीचा लोखंडी कोयता जप्त करण्यात आला. त्या कालावधीत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घातक शस्त्र बाळगण्यास मनाई आदेश लागू असतानाही आरोपीने त्याचे उल्लंघन केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणी पोलिस शिपाई आकाश श्रावण सोनवणे यांनी फिर्याद दिली असून दापोडी पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणाला मारहाण; तिघांविरोधात गुन्हा दाखल
जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका तरुणाला पट्ट्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी काळेवाडी पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना थेरगाव येथील पवारनगर परिसरात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिमाशंकर ऊर्फ नागेश महादेव जेवळे (वय २०, रा. शिवतीर्थनगर, पवारनगर, थेरगाव) हे अन्नपूर्णा खानावळ व स्नॅक्स सेंटरसमोर, कृष्णार्जुन मार्ग येथे सोमवारी (दि. २७) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आले होते. त्यावेळी आरोपी चैतन्य कागे, दर्शन सोमवंशी आणि ईरेश लोहार यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांच्याशी वाद घातला.
यावेळी चैतन्य कागे याने पट्ट्याने फिर्यादीच्या डोक्यावर, पाठीवर व हातावर मारहाण करून जखमी केले. तसेच तिघांनी हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ‘पोलिसांत तक्रार केली तर तुला जिवंत सोडणार नाही,’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी भिमाशंकर जेवळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून काळेवाडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 तळेगाव दाभाडेतून अॅक्टिव्हाची चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल
तळेगाव दाभाडे परिसरात रस्त्यावर पार्क केलेली होंडा अॅक्टिव्हा दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. २७) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत बालाजी आचितराव राऊत (वय ४०, रा. तळेगाव दाभाडे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, २२ जुलै रोजी दुपारी १.३० ते सायंकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान मराठा क्रांती चौकाजवळ, ड्रीम लंच होमच्या बाजूच्या रस्त्यावर फिर्यादी यांनी त्यांची होंडा कंपनीची अॅक्टिव्हा दुचाकी (क्रमांक एमएच १४ जीव्ही २७९१) पार्क केली होती.
अज्ञात चोरट्याने आर्थिक फायद्याच्या उद्देशाने लबाडीने ही दुचाकी चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. चोरी झालेल्या दुचाकीची किंमत सुमारे २० हजार रुपये आहे.
या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात नुसार भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------