क्राइम रिपोर्ट - शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - २९ जुलै २०२६

क्राइम रिपोर्ट  -  शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - २९ जुलै २०२६

क्राइम रिपोर्ट -

शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - २९ जुलै २०२६ 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

🔴 बँक खाते सायबर फसवणुकीसाठी वापरल्या प्रकरणी युवकावर गुन्हा

बॅंकेत खात्याचा वापर सायबर फसवणुकीच्या आर्थिक व्यवहारांसाठी केल्याप्रकरणी एका २० वर्षीय युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या युवकाने उघडलेल्या बॅंक खात्याद्वारे ३० लाख २ हजार ७४२ रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले असून त्याद्वारे भारतातील २ नागरिकांची फसवणूक झाली आहे.    

याबाबत, पोलिस शिपाई सुमित मारुती मोरे यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीचे नाव वेदांत अनिल कुदळे (वय २०, रा. विवेकनगर, आकुर्डी) असे आरोपीचे नाव आहे. त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. आरोपीने एका बॅंकेत खाते उघडून साथीदारांशी संगनमत करून सायबर फसवणुकीसाठी त्याचा वापर केला. या खात्यावर एकूण ३० लाख २ हजार ७४२ रुपये १५ पैशांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच देशातील दोन नागरिकांच्या तक्रारींमधील एकूण २ लाख २६ हजार २४९ रुपये १५ पैशांची रक्कम या खात्यात स्वीकारण्यात आल्याचे उघड झाले आहे.

या प्रकरणी आरोपीवर निगडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११२(२), ६१(२), ३१८(४) व ३(५) अन्वये मंगळवारी (ता. २८) गुन्हा दाखल करण्यात आला. 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


🔴 सायबर फसवणुकीतील रक्कम स्विकारण्यासाठी बॅंक खाते उपलब्ध करुन दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल

सायबर गुन्हेगारी टोळीद्वारे फसवणूक करण्यात आलेली रक्कम स्वीकारण्यासाठी बँक खाते उपलब्ध करून दिल्याप्रकरणी चाकण उत्तर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिस शिपाई उमेश बळीराम कांबळे (चाकण उत्तर पोलिस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार किशन मनोज राजभर (रा. चाकण, ता. खेड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने १ ऑक्टोबर २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत चाकण येथील बॅंकेत खाते उघडले. या खात्यातून तब्बल १ कोटी २३ लाख ७३ हजार ५६१ रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले आहे.

सायबर गुन्हेगारी टोळीच्या वतीने भारतभरातील सात नागरिकांची फसवणूक करून मिळवलेली रक्कम स्वीकारण्यासाठी आरोपीने आपल्या बँक खात्याचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. 

या प्रकरणी आरोपीवर उत्तर चाकण पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ६१(२), ११२(२), ३१८(४), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००० मधील कलम ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

🔴 वाहन पार्किंगच्या कारणावरून विट फेकून मारल्याने तरुण जखमी 

घरासमोर दुचाकी लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका २२ वर्षीय तरुणाला विट फेकून मारुन जखमी केल्याची घटना पिंपरी येथे २० जुलैला घडली. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. २८) एका इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २० जुलै रोजी रात्री सव्वाआठच्या सुमारास सत्यनारायण मंदिराजवळ, पिंपरी येथे घडली. फिर्यादी पवन पुरुषोत्तम गिडवाणी (सत्यनारायण मंदिराजवळ, पिंपरी) यांच्या घरासमोर त्यांच्या वडिलांनी अॅक्टिव्हा दुचाकी लावली होती.

यावेळी आरोपी अशोक परमानंद धणवाणी (वय अंदाजे ५५, रा. सत्यनारायण मंदिराजवळ, पिंपरी) यांनी ‘येथे गाडी लावायची नाही’ असे म्हणत फिर्यादीशी वाद घातला. त्यानंतर शिवीगाळ करत रस्त्यावर पडलेली मातीची विट उचलून फिर्यादीच्या दिशेने फेकली. ही विट डोक्याच्या मागील बाजूस लागल्याने फिर्यादी जखमी झाले.

या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२५ (ड), ३५२ आणि ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

🔴 महाळुंगे येथून ४५ हजारांची बुलेट चोरीला

महाळुंगे परिसरातील एका चाळीसमोर पार्क केलेली सुमारे ४५ हजार रुपये किमतीची बुलेट मोटारसायकल २२ जून २०२६ ते २ जुलै २०२६ या कालावधीत अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मंगळवारी (ता. २८) बावधन पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शहाजी नामदेव वाघमारे (वय ५२, रा. अनिकेत कोळेकर यांची चाळ, महादेव मंदिराजवळ, महाळुंगे, ता. मुळशी) यांनी त्यांची काळ्या रंगाची बुलेट मोटारसायकल (क्रमांक एमएच १२ टीझेड ०६९८) २२ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घरासमोरील जागेत लॉक करून पार्क केली होती. २ जुलै रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पाहणी केली असता मोटारसायकल जागेवर आढळून आली नाही. अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या उद्देशाने ती चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

याबाबत २८ जुलै रोजी दुपारी ३.५० वाजता बावधन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बावधन पोलीस करत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

🔴 कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुन्हेगाराला जुनी सांगवीमध्ये अटक

तडीपार आदेश लागू असतानाही शहराच्या हद्दीत प्रवेश करून विनापरवाना लोखंडी कोयता बाळगणाऱ्या तरुणाला सांगवी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई मंगळवारी (ता. २८) सायंकाळी जुनी सांगवी येथील वसंतदादा पुतळ्यासमोरील गणपती विसर्जन घाटाजवळील रस्त्यावर करण्यात आली.

या प्रकरणी पोलीस हवालदार शैलेश गुलाब मगर (ब.नं. १९६१), सांगवी पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय दशरथ शिंदे (वय २३, रा. जगताप पेट्रोल पंपाशेजारी, वैद वस्ती, पिंपळे गुरव, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी अक्षय शिंदे याला परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ (१) (ब) अंतर्गत पुणे पोलीस आयुक्तालय, पुणे ग्रामीण व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून १ जुलै २०२५ ते १ जुलै २०२७ या कालावधीसाठी तडीपार करण्यात आले होते. तसेच घातक शस्त्र बाळगण्यास मनाई असतानाही त्याच्याकडे लोखंडी कोयता आढळून आला. त्यामुळे तडीपारीच्या आदेशासह पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली.

 आरोपीविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. २८) भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४ (२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५, १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

🔴 गहुंजेत गांजासह एकाला अटक, साथीदाराचा शोध सुरू

गहुंजे गावातील विठ्ठल मंदिराच्या मागील बाजूस गांजा बाळगणाऱ्या तरुणाला शिरगाव परंदवडी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई मंगळवारी (ता. २८)  करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अरबाज बशिर शेख (वय २८, रा. विठ्ठल मंदिराजवळ, गहुंजे, ता. मावळ) असे आहे. अरबाजला गांजा आणून देणारा सलमान बशिर शेख याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

 आरोपी अरबाज शेख याच्याकडे कॅनाबिस वनस्पतीची पाने, फुले, बिया व बोंडे यांचा समावेश असलेला हिरवट तपकिरी रंगाचा ओलसर गांजा आढळून आला. या गांजाची किंमत १८ हजार ३१४ रुपये असून, त्याच्याकडून ५ हजार रुपये किमतीचा मोटोरोलाचा मोबाईल असा एकूण २३ हजार ३१४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी पोलिस हवालदार सचिन बबनराव काचोळे (वय ३८, ब. नं. ९१७, शिरगाव परंदवडी पोलिस ठाणे) यांनी फिर्याद दिली. आरोपींविरोधात मंगळवारी (ता. २८) शिरगाव पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये कलम ८(क), २०(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories