क्राइम रिपोर्ट - शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - ४ ऑगस्ट २०२६
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 रहाटणीत कोयत्याचा धाक दाखवून तरुणाला लुटले, एकाला अटक
रहाटणी परिसरात कोयत्याचा धाक दाखवून एका तरुणाकडील तीन हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून त्याच्या दुचाकीचे नुकसान केल्याची घटना सोमवारी (ता. ३) रात्री घडली. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
या प्रकरणी सुमित सुनिल गवारे (वय २०, रा. रहाटणी) याने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. २) रात्री २.१० च्या सुमारास फिर्यादी सुमित हा त्याच्या दुचाकीवरून पवनानगर, रहाटणी येथून छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या दिशेने चहा पिण्यासाठी जात होता. त्यावेळी त्याच्या तोंडओळखीचा दीपक जाधव व कार्तिक निकाळजे (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) यांनी सुमितला अडवून कोयत्याचा धाक दाखवला. त्यानंतर सुमितच्या पँटच्या खिशातील तीन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच दुचाकीच्या इंधन टाकीवर कोयत्याने वार करून नुकसान केले.
या प्रकरणी आरोपी दीपक जाधव याला पोलिसांनी अटक केली. दोन्ही आरोपींविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता - २०२३ मधील कलम ३०९(६), ३२४(४), ३(५), आर्म अॅक्ट कलम ४(२५), २७ तसेच मुंबई पोलिस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 सायबर फसवणूकी प्रकरणी वाकडमधील एकावर गुन्हा दाखल
बॅंकेत खाते उघडून त्या खात्याचा वापर सायबर फसवणुकीसाठी केल्याबद्दल वाकड येथील एका इसमाविरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. ३) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी हा प्रकार समोर आला. या प्रकरणातील आरोपी अक्षय संजय तांबे (रा. कस्पटे वस्ती, वाकड) याने एका बँकेत खाते उघडले सायबर फसवणूक करणाऱ्या गटाचा सदस्य म्हणून साथीदारांशी संगनमत करुन आर्थिक व्यवहार केले. देशातील दोन नागरिकांची एकूण ५० लाख ९४ हजार ९८९ रुपये इतकी आर्थिक फसवणूक झालेल्या व्यवहारांपैकी आरोपीच्या खात्यावर २८ हजार २८० रुपये जमा झाल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी पोलिस हवालदार आर. बी. गोडांबे यांनी फिर्याद दिली. आरोपीवर हिंजवडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११२(२), ६१(२), ३१८(४), ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 पिंपरीत सायबर फसवणुकीची रक्कम एटीएमद्वारे काढल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
स्वतःचे बॅंक खाते सायबर फसवणूकीसाठी उपलब्ध करुन देऊन त्या खात्यावर प्राप्त झालेली रक्कम 'एटीएम'मधून रोख स्वरूपात काढल्या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. ३) एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी प्रविण मार्कंडेय दासरी (पोलीस शिपाई, बकल क्रमांक ३५२४, पिंपरी पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार बॅंक खातेदार पवन दादासाहेब येवले (रा. जि. बीड) तसेच त्याच्या अन्य साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ मार्च २०२६ रोजी हा प्रकार समोर आला. आरोपीने संघटीत सायबर गुन्हेगारीचा गटाचा एक सभासद म्हणून राजस्थान राज्यातील ईस्ट जयपूर शहर, बजाज नगर पोलिस स्टेशन येथील तक्रारदाराची १,००,०४५/- रुपये रक्कम स्वतःच्या खात्यावर प्राप्त करुन ती फसवणुकीची रक्कम एटीएमद्वारे रोख स्वरुपात काढून घेतल्याचे निष्पन्न झाले. साथीदारांशी संगनमत करुन त्याने हा गैरव्यवहार केला.
सायंकाळी ७.४० ते ८ वाजण्याच्या दरम्यान पिंपरी येथील पंजाब नॅशनल बँकेच्या 'ज्वेल्स ऑफ पिंपरीकमला' शाखेतील एटीएम (आयडी : B1451800) मधून फसवणुकीची रक्कम काढण्यात आली. तपासादरम्यान आरोपीने साथीदारांशी संगनमत करून संघटित सायबर गुन्हेगारी टोळीचा सदस्य म्हणून राजस्थानमधील ईस्ट जयपूर, बजाज नगर पोलीस ठाण्यातील एनसीसीआरपी तक्रार क्रमांक ३२७०३२६००२६५२९ मधील तक्रारदाराची १ लाख ४५ रुपये रक्कम स्वतःच्या खात्यावर स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ही रक्कम एटीएमद्वारे रोख स्वरूपात काढल्याचेही तपासात समोर आले.
या प्रकरणी आरोपीवर पिंपरी पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. ८) भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११२(२), ६१(२), ३१८(४), ३१७(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६(ड) आणि संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 गहुंजेतील फ्लॅटमधून २१ लाखांचे सोन्याचे दागिने चोरले, त्याजागी ठेवले बनावट दागिने
गहुंजे येथील लोढा बेलमेन्डो सोसायटीतील एका फ्लॅटमधून तब्बल २१ लाख २५ हजार ६०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून त्याजागी बनावट सोन्याचे दागिने ठेवून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना १० मे २०२६ ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत घडली आहे. या प्रकरणी शिरगाव पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. ३) २७ वर्षीय युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत बिना कौर मारवा (वय ५८, रा. गहुंजे, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अभिषेक लाखनसिंग सेगर (वय २७, रा. इंदूर, मध्यप्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १० मे २०२६ ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत फिर्यादी यांच्या गहुंजे येथील राहत्या घरातून आरोपीने संमतीशिवाय आणि आर्थिक फायद्याच्या उद्देशाने २१ लाख २५ हजार ६०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरले. तसेच चोरी केलेल्या दागिन्यांच्या जागी बनावट सोन्याचे दागिने घरातील लाकडी कपाटात ठेवून फिर्यादी यांची फसवणूक केली.
या प्रकरणी आरोपीवर शिरगाव पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०६, ३१८(२), तसेच भारतीय दंड विधान कलम ३८१ आणि ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 कार बाजूला घेण्याच्या कारणावरून दोघांना मारहाण, वाकडमधील घटना
कार बाजूला घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून हॉटेल व्यावसायिक व त्यांच्या कामगाराला लाथाबुक्क्यांनी, लाकडी दांडक्याने आणि सिमेंट ब्लॉकने मारहाण करून जखमी केल्याची घटना वाकड येथील दत्त मंदिर रोडवरील उत्कर्ष चौकात सोमवारी (ता. ३) घडली. यावेळी मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या महिलेस धक्काबुक्की करण्यात आली. तसेच हॉटेलवर दगडफेक केल्याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी तेजस अनिल भागडे (वय ३६, रा. पिंपळे सौदागर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोमेश्वर साहेबराव तोरगे (वय २२, रा. गणेश नगर, थेरगाव) आणि प्रज्वल महादेव मगर (वय अंदाजे १८, रा. चिंचवड स्टेशन) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना समज देऊन सोडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
सोमवारी (३ ऑगस्ट) फिर्यादी तेजस भागडे हे पत्नी गौरी, मावशी जया मोरे आणि मुलगी श्रीजा यांच्यासह कारमध्ये बसले होते. त्यावेळी त्यांनी हॉटेलमधील कामगार वैभव लक्ष्मण उकंडे यास पाण्याची बाटली आणण्यासाठी पाठविले. दरम्यान, कारच्या मागून आलेल्या ट्रॅक्टरला जाण्यास पुरेशी जागा असतानाही कार बाजूला घेण्याच्या कारणावरून ट्रॅक्टरमधील दोघांनी (आरोपींनी) वाद घालत फिर्यादी तेजस व वैभव यांना शिवीगाळ केली. त्यानंतर हाताने, लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी दांडका आणि सिमेंट ब्लॉकने मारहाण करून दुखापत केली.
मारहाण सुरू असताना फिर्यादी यांच्या पत्नी गौरी या सोडविण्यासाठी मध्ये पडल्या असता त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. तसेच आरोपींनी हॉटेलवर दगडफेक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी आरोपींवर वाकड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 मुलाच्या वडिलांना छत्रीच्या दांड्याने मारहाण; चिखलीत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुलाला खायला घेऊन जाण्यासाठी पार्किंगमध्ये गेलेल्या वडिलांना शिवीगाळ करून छत्रीच्या दांड्याने मारहाण केल्याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (ता. ३) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास जाधववाडी येथील रिव्हर रेसीडन्सी सोसायटीच्या एफ-३०६ इमारतीच्या पार्किंगमध्ये घडली.
या प्रकरणी शैलेश अनंत क्षीरसागर (वय ३८, रा. जाधववाडी, चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मधुकर हावळ (वय ६९) आणि मयुरी शैलेश क्षीरसागर (वय ३५, दोघे रा. जिग्रेट सोसायटी, आंबेगाव बुद्रुक, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा अर्णव याने काहीतरी खायला देण्याची मागणी केल्याने ते त्याला घेऊन पार्किंगमध्ये गेले होते. त्यावेळी आरोपी दोघे तेथे आले. त्यांनी मुलाला पकडून फिर्यादी यांच्याबाबत वाईट बोलत शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर आरोपी जेवणाच्या डब्याची पिशवी घेऊन जात असताना फिर्यादी यांनी ती परत घेण्याचा प्रयत्न केला.
याचा राग मनात धरून आरोपींनी हातातील छत्रीच्या दांड्याने फिर्यादी यांच्या डाव्या हाताच्या तळहातावर व दंडावर मारहाण केली. यात ते जखमी झाले असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३५२, ३५१(२), ३(५) तसेच भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चिखली पोलिस करीत आहेत.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 आळंदीतून अॅक्टिव्हा चोरीला, अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल
आळंदी येथील माऊली पार्क परिसरातून होंडा अॅक्टिव्हा दुचाकी चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिपाली बसवराज पाटील (वय ३९, रा. पर्णानगर, चिंचवड) यांनी त्यांची काळ्या रंगाची होंडा अॅक्टिव्हा आळंदी नगरपरिषद हद्दीतील माऊली पार्क येथे २६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ६.१५ ते सायंकाळी ५.३० या कालावधीत पार्क केली होती.
यावेळी अज्ञात व्यक्तीने फिर्यादीच्या संमतीशिवाय व लबाडीच्या उद्देशाने दुचाकी चोरून नेली. या प्रकरणी सोमवारी (ता. ३) आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) तसेच भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 चिखलीत देशी बनावटीचे पिस्तूल व दोन काडतुसांसह दोघांना अटक
चिखली परिसरात अवैधरीत्या देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या दोघांना चिखली पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवारी (ता. ३) करण्यात आली. या प्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत पोलीस हवालदार विनोद तानाजी व्होनामे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामायण मैदानाजवळील पाण्याच्या टाकीखाली, जाधववाडी, चिखली येथे ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास कारवाई करण्यात आली. गुरुराज देविदास फंड (वय १८, रा. आंबेडकर वसाहत, परिहार चौक, आळंदी, पुणे. मूळ रा. वरुडे, ता. शिरूर) तसेच एका १६ वर्षीय विधीसंघर्षित बालकाकडे देशी बनावटीचे पिस्तूल, मॅगझीन आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली.
या शस्त्रांची एकूण किंमत ३१ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त यांनी जारी केलेल्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 रहाटणीत कोयता बाळगणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात
रहाटणी येथील गोडांबे चौक परिसरात धारदार लोखंडी कोयता बाळगणाऱ्या १९ वर्षीय तरुणावर काळेवाडी पोलिसांनी कारवाई केली. शस्त्रबंदी आदेश लागू असतानाही कोयता जवळ बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिस शिपाई रमेश रामनाथ खेडकर (नेमणूक काळेवाडी पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपी दीपक ज्ञानेश्वर जाधव (वय १९, रा. साई कॉलनी क्रमांक १, नखातेवस्ती, रहाटणी, पुणे; मूळ रा. भोसरी, ता. परभणी, जि. परभणी) याच्याकडे २०० रुपये किमतीचा धारदार लोखंडी कोयता आढळून आला.
सोमवारी (ता. ३) गोडांबे चौक, रहाटणी येथे ही कारवाई करण्यात आली. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार शहरात २२ जुलै ते ४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत दगड, शस्त्रे, चाकू, सुरा, कोयता यांसह नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली होती. या आदेशाचा भंग केल्याने आरोपीविरुद्ध काळेवाडी पोलिस ठाण्यात आर्म अॅक्ट ४ (२५) महाराष्ट्र पोलिस अधि. १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------