पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा दिलासा
१०, २० व ३० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या पात्र अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ
पिंपरी, ता. २९ जुलै २०२६ - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाअंतर्गत सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा (Assured Career Progression Scheme) लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत १० वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या पात्र कर्मचाऱ्यांना पहिला, २० वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना दुसरा तसेच ३० वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना तिसरा लाभ मंजूर करण्यात आला असून, त्याबाबतचे स्वतंत्र प्रशासकीय आदेश जारी करण्यात आले आहेत.
महापालिका आयुक्तांच्या मान्यतेनंतर शासन निर्णय, पदोन्नती समितीचे निर्णय तसेच सेवाप्रवेश नियमांच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेचा लाभ देताना कर्मचाऱ्यांची नियमित सेवा, पदोन्नतीसाठी आवश्यक पात्रता, विभागीय परीक्षा, गोपनीय अहवाल, प्रलंबित विभागीय चौकशी, न्यायालयीन प्रकरणे तसेच इतर सेवा अटींची पडताळणी करण्यात येणार आहे. पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या विद्यमान वेतनश्रेणीतील पुढील वेतनस्तराचा लाभ मंजूर करण्यात येईल.
नवीन सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण नियम, २०२० लागू होण्यापूर्वी नियुक्त झालेल्या तसेच त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र निकष निश्चित करण्यात आले असून, त्यानुसार पात्र अधिकारी-कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मंजूर करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठतेला न्याय मिळण्यासोबतच त्यांच्या मनोबलातही निश्चितच वाढ होणार आहे.
या निर्णयाअंतर्गत १० वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या २१६ अधिकारी व कर्मचाऱ्यांना पहिला लाभ, २० वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या ३१९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना दुसरा लाभ, तर ३० वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या २३७ अधिकारी व कर्मचाऱ्यांना तिसरा लाभ मंजूर करण्यात आला आहे. संबंधित विभागामार्फत आवश्यक प्रशासकीय कार्यवाही टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येत आहे.
प्रशासन अधिक कार्यक्षम होण्यास मदत...
“महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या मनोबलात वाढ होण्यासोबतच प्रशासन अधिक कार्यक्षम होण्यास मदत होईल. पात्र सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियमानुसार या योजनेचा लाभ देण्यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध आहे.”
– डॉ. विजय सूर्यवंशी
आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
कर्मचारी हिताला प्राधान्य...
“सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात येत असून, पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियमानुसार लाभ दिला जात आहे. आवश्यक कागदपत्रे, सेवा अभिलेख व प्रशासकीय पूर्तता पूर्ण होताच उर्वरित पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात येईल. कर्मचारी हिताला प्राधान्य देत ही प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.”
– विक्रांत बगाडे
अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका