पिंपरी | १९ नोव्हेंबर २०२६ : औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराला जागतिक क्रीडा क्षेत्रात नवी ओळख मिळवून देण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या वतीने १० जानेवारी २०२७ रोजी ‘पीसीएमसी ग्रँड मॅरेथॉन’ आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत ४२ किलोमीटर फुल मॅरेथॉन, २१ किलोमीटर हाफ मॅरेथॉन, १० किलोमीटर आणि ५ किलोमीटर अशा चार गटांचा समावेश असणार आहे. महापौर रवि लांडगे आणि महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
शहरातील नागरिकांमध्ये आरोग्य आणि फिटनेसविषयी जागरूकता निर्माण करणे, तरुणांना धावण्याची प्रेरणा देणे आणि स्थानिक, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय धावपटूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
मॅरेथॉनच्या आयोजनासाठी अशा स्पर्धांचा अनुभव असलेल्या संस्थेची मदत घेतली जाणार आहे. स्पर्धेची नोंदणी आणि इतर व्यवस्थापन आंतरराष्ट्रीय मानकांनुसार करण्यात येणार असून, या मॅरेथॉनचा जागतिक मॅरेथॉन कॅलेंडरमध्ये समावेश व्हावा, यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
यावेळी महापौर रवि लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहराने औद्योगिक क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आता क्रीडा क्षेत्रातही शहराला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. या मॅरेथॉनमुळे तरुणाई आणि नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैलीची प्रेरणा मिळेल. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, चार विविध अंतरांच्या शर्यतींमुळे वेगवेगळ्या वयोगटांतील धावपटूंना सहभागाची संधी मिळणार आहे. शहरात क्रीडा संस्कृती रुजविणे, नागरिकांच्या आरोग्याला प्रोत्साहन देणे आणि पिंपरी-चिंचवडला आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात स्थान मिळवून देणे हा आयोजनामागील मुख्य उद्देश आहे.
मॅरेथॉनचा नियोजित मार्ग डी. वाय. पाटील मैदान येथून सुरू होणार असून, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक, भक्ती-शक्ती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, टेल्को रोड, इंद्रायणीनगर, एम्पायर इस्टेट ब्रिज, काळेवाडी चौक, डांगे चौक, संत तुकाराम ब्रिज, रावेत आणि कॅन्टोन्मेंटमार्गे पुन्हा डी. वाय. पाटील मैदान येथे समाप्त होणार आहे.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या धावपटूंना indiarunning.com या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे.
पत्रकार परिषदेला उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, क्रीडा समिती सभापती कैलास कुटे, सदस्य योगेश लांडगे, धर्मपाल तंतरपाळे, शाम जगताप, तानाजी बारणे, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, उपायुक्त अण्णा बोदडे, पंकज पाटील आणि जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.
विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी या मॅरेथॉनमुळे शहराच्या क्रीडा क्षेत्रातील वाटचालीला नवी दिशा मिळेल, असे मत व्यक्त केले. तर अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी या उपक्रमामुळे देश-विदेशातील धावपटू, क्रीडाप्रेमी आणि पर्यटकांना शहराकडे आकर्षित करण्याची संधी निर्माण होईल, असे सांगितले.