कंत्राटी कामगारांची हजेरी कशी तपासणार? महापालिकेकडे बायोमेट्रिकची मागणी

कंत्राटी कामगारांची हजेरी कशी तपासणार? महापालिकेकडे बायोमेट्रिकची मागणी

पिंपरी : महापालिकेच्या विविध विभागांत कंत्राटदारांमार्फत कामगार नेमले जातात. कंत्राटदाराने हजेरीपत्रकात दाखवलेले कामगार प्रत्यक्ष कामावर येतात का, हे तपासण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असावी, अशी मागणी आता महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे. शिवसेनेचे पुणे जिल्हा संघटक संतोष सौंदणकर यांनी अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांना याबाबत निवेदन दिले आहे.

स्वच्छता, सुरक्षा, आरोग्य, उद्यान, पाणीपुरवठा आणि विद्युत विभागांत कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. काही ठिकाणी कागदोपत्री दाखवलेली कामगारसंख्या आणि प्रत्यक्ष उपस्थिती यांत तफावत असण्याची शक्यता त्यांनी निवेदनात व्यक्त केली. अशा तफावतीमुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले.

तसेच प्रत्येक कामगाराची नियुक्तीपूर्वी पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी करावी, अशी मागणी सौंदणकर यांनी केली. कंत्राटदारांनी कामगारांची अद्ययावत नामावली, छायाचित्रे, ओळखपत्रे आणि पडताळणीचा तपशील महापालिकेकडे जमा करावा. कामगार कुठे नेमला आहे, त्याची कामाची वेळ काय आहे आणि तो दररोज उपस्थित होता का, याची डिजिटल नोंद ठेवावी, असेही त्यांनी सुचवले.

बायोमेट्रिक हजेरीची नोंद तपासल्याशिवाय कंत्राटदारांची बिले अदा करू नयेत, अशी मागणीही निवेदनात केली आहे. बनावट हजेरी लावणे, अनुपस्थित कामगाराला हजर दाखवणे किंवा कामगारांची संख्या वाढवून दाखवणे असे प्रकार आढळल्यास संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करावी. गंभीर प्रकरणांत करार रद्द करून कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे, असे निवेदनात म्हटले आहे.

नव्या निविदांमध्ये या अटींचा स्पष्ट समावेश करावा आणि नियुक्तीपासून बिले अदा करण्यापर्यंतच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी, अशी मागणी सौंदणकर यांनी केली. निवेदन देताना त्यांच्यासोबत सुमित कांबळे, सुरज भराटे आणि सुभाष मालुसरे उपस्थित होते.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories