खासदार मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेच्या उपसभाध्यक्षांच्या पॅनेलवर नियुक्ती!

खासदार मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेच्या उपसभाध्यक्षांच्या पॅनेलवर नियुक्ती!

पुणे | २८ नोव्हेंबर २०२६ : राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर संसदीय कामकाजाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांची राज्यसभेच्या उपसभाध्यक्षांच्या पॅनेलवर नियुक्ती करण्यात आली आहे. उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी ही नियुक्ती केली असून, राज्यसभा सचिवालयाने २७ नोव्हेंबर रोजी यासंदर्भातील पत्र जारी केले आहे.

राज्यसभेच्या कार्यपद्धती आणि कामकाजासंबंधीच्या नियमावलीतील नियम ८ च्या उपनियम (१) अंतर्गत मेधा कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यसभा सचिवालयाचे संचालक विजय कुमार यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, २७ नोव्हेंबर २०२६ पासून ही नियुक्ती प्रभावी झाली आहे.

१५ एप्रिल २०२६ रोजी पुनर्गठित करण्यात आलेल्या राज्यसभेच्या उपसभाध्यक्षांच्या पॅनेलमध्ये मेधा कुलकर्णी यांच्यासह आणखी सहा सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये एस. फांगनॉन कोन्याक, डॉ. एम. थंबी दुराई, डॉ. सस्मित पात्रा, फुलो देवी नेताम आणि घनश्याम तिवारी यांचा समावेश आहे.

राज्यसभेचे सभापती आणि उपसभापती यांच्या अनुपस्थितीत नियमानुसार सभागृहाच्या कामकाजाचे अध्यक्षस्थान भूषविण्याची जबाबदारी या पॅनेलमधील सदस्यांना पार पाडता येते. त्यामुळे डॉ. मेधा कुलकर्णी यांनाही राज्यसभेच्या कामकाजाचे संचालन करण्याची संधी मिळणार आहे.

ही नियुक्ती आपल्यासाठी आणखी एक गौरवशाली आणि अभिमानास्पद संधी असल्याची प्रतिक्रिया डॉ. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे. आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल आणि सोपविण्यात आलेल्या जबाबदारीबद्दल त्यांनी उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि राज्यसभेतील सभागृह नेते जगत प्रकाश नड्डा यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानले आहेत.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories