महापालिकेच्या स्थायी समिती सभेत जलनिस्सारण व्यवस्था सुधारणा, रस्ते विकास, आरोग्य सुविधा, स्वच्छता अभियान व स्मार्ट सिटी प्रकल्पांसह विविध विकासकामांना मंजुरी
महापालिकेच्या स्थायी समिती सभेत जलनिस्सारण व्यवस्था सुधारणा, रस्ते विकास, आरोग्य सुविधा, स्वच्छता अभियान व स्मार्ट सिटी प्रकल्पांसह विविध विकासकामांना मंजुरी
पिंपरी, ता. १७ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभा पार पडली. या सभेमध्ये शहरातील पायाभूत सुविधा, जलनिस्सारण व्यवस्था, रस्ते विकास, आरोग्य सेवा, स्वच्छता, माहिती तंत्रज्ञान तसेच विविध प्रशासकीय विषयांशी संबंधित महत्त्वपूर्ण प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
या बैठकीस स्थायी समिती सदस्यांसह आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, नगरसचिव मुकेश कोळप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
सभेमध्ये व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सन २०२५-२६ करिता चिंचवड गुरुकुल वाहिनी व रायसिंग मेनच्या देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच प्रभाग क्रमांक ६ मधील चऱ्होली वसाहत, सद्गुरूनगर, लांडे वस्ती, देवकर वस्ती, मधुबन सोसायटी, महादेवनगर तसेच धावडे वस्ती, मेघा वस्ती, गुंडे वस्ती, श्रीकृष्ण कॉलनी आणि परिसरातील रस्ते उच्चदाब पद्धतीने विकसित करण्याच्या कामांना मान्यता देण्यात आली.
जलनिस्सारण व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी प्रभाग क्रमांक ९ व १० मधील विविध भागांमध्ये मलनिस्सारण नलिकांमध्ये सुधारणा करण्याची कामे मंजूर करण्यात आली. तसेच थेरगाव-काळेवाडी परिसरातील साईदत्तनगर, यशोधनगर, महात्मा फुले नगर, भारतमातानगर, राजीव गांधी नगर आणि इतर परिसरांमध्ये जलनिस्सारण व्यवस्था सुधारणा करण्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली.
याशिवाय अ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विविध परिसरांतील जलनिस्सारण व्यवस्था सुधारणा, विद्य्यानगर, दत्तनगर, शंकरनगर, इंदिरानगर, लालटोपीनगर, साईबाबानगर, रामनगर, महात्मा फुलेनगर, आंबेडकरनगर, जयमल्हारनगर, काळभोरनगर आदी झोपडपट्टी भागांमधील सुधारणा कामे तसेच फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत दुर्गानगर (आकुर्डी), अंजननगर, राजनगर, समतानगर (निगडी), सिद्धार्थनगर, मोरेवस्ती आणि इतर परिसरांतील जलनिस्सारण सुधारणा कामांना मंजुरी देण्यात आली.
रहाटणी परिसरातील जलनिस्सारण नलिकांची देखभाल व दुरुस्ती, ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत जलनिस्सारण नेटवर्क आधुनिक यांत्रिकी पद्धतीने सुस्थितीत ठेवणे, तसेच जलनिस्सारण नलिकांची दैनंदिन देखभाल व सुरळीत कार्यान्वयनाची कामे करण्यास मान्यता देण्यात आली.
आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी सोनोग्राफी मशीनमधील निकामी झालेला मदरबोर्ड बदलण्यासाठी आवश्यक अतिरिक्त खर्चास मंजुरी देण्यात आली. तसेच यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या क्ष-किरण विभागासाठी कम्प्युटराइज्ड रेडिओग्राफी प्रणालीसाठी आवश्यक एक्स-रे फिल्म्स खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली.
वायसीएम रुग्णालयामध्ये इलेक्ट्रिक सेफ्टी ऑडिट अहवालानुसार आवश्यक विद्युत विषयक कामे करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच पवनाथडी जत्रेसाठी वाढीव स्टॉल्सच्या अनुषंगाने आवश्यक प्रकाश व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा व जनरेटर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक खर्चास मान्यता देण्यात आली.
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत आयसीसीसी निगडी येथील डेटा सेंटरमधील जीआयएस-ईआरपी प्रकल्पासाठी वापरात असलेल्या सर्व्हरच्या डिस्कमध्ये बिघाड झाल्याने आवश्यक हार्डवेअर बदल व दुरुस्तीची कामे करण्यासाठी खर्चास मंजुरी देण्यात आली.
स्वच्छ भारत अभियान व महाराष्ट्र स्वच्छता अभियानांतर्गत जनजागृतीसाठी फ्लेक्स, बोर्ड, बॅनर, स्टिकर्स छपाई तसेच बोलकी भित्तीचित्रे व घोषवाक्यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या उपक्रमांना कार्योत्तर मान्यता देण्यात आली.
क प्रभाग व ड प्रभागातील जलनिस्सारण नलिकांची वार्षिक ठेकेदारी पद्धतीने यांत्रिक साफसफाई व चोकअप काढण्याच्या कामांना मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आली. तसेच ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत जलनिस्सारण नलिकांची आधुनिक यांत्रिकी पद्धतीने देखभाल करण्यासाठी कामे सुरू ठेवण्यास मंजुरी देण्यात आली.
ह.भ.प. प्रभाकर महाराज कुटे रुग्णालय (आकुर्डी), जिजामाता रुग्णालय आणि नवीन भोसरी रुग्णालय येथील दैनंदिन साफसफाई व स्वच्छता कामकाजासाठी आवश्यक मनुष्यबळ, उपकरणे व साहित्य उपलब्ध करून यांत्रिक पद्धतीने स्वच्छता सेवा सुरू ठेवण्यासाठी मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात आली.
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत जनजागृतीसाठी रिक्षा व स्पीकर भाडे तसेच मोहिमेसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या मानधनाच्या खर्चास मान्यता देण्यात आली.
जलशुद्धीकरण केंद्र क्रमांक २३ अंतर्गत टप्पा १, २, ३ व ४ मधील विविध कामांसाठी प्राप्त निविदा स्वीकारून कामे हाती घेण्यास मंजुरी देण्यात आली.
सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या अनुषंगाने पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम, चर्चासत्रे, साहित्य खरेदी तसेच जनजागृती उपक्रम राबविण्यासाठी अपेक्षित खर्चास मान्यता देण्यात आली.
तसेच पिंपळे सौदागर येथील मराठी मंदिर सांस्कृतिक भवनातील हॉल पोस्ट ऑफिस कार्यालयासाठी भाडेतत्त्वावर देण्यास व त्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या मासिक भाडेदरास मंजुरी देण्यात आली.
प्रभाग क्रमांक २९ पिंपळे गुरव व परिसरातील महापालिका इमारती तसेच स्मशानभूमीतील स्थापत्य विषयक देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यासाठी प्राप्त निविदा स्वीकारून संबंधित कामे हाती घेण्यास मान्यता देण्यात आली. याशिवाय श्रीमती अक्षयदा अनिल बडगुळे यांनी मजूर पदावरून लिपिक पदावर पुनर्नियुक्ती मिळावी यासाठी दाखल केलेल्या अपील अर्जास मंजुरी देण्यात आली.
महत्त्वपूर्ण विषयांना मंजुरी........
"पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना अधिक सक्षम आणि दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्थायी समितीने विविध महत्त्वपूर्ण विषयांना मंजुरी दिली आहे. जलनिस्सारण व्यवस्था सुधारणा, रस्ते विकास, आरोग्य सुविधांचे सक्षमीकरण, स्वच्छता अभियान, स्मार्ट सिटी प्रकल्प तसेच सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मंजूर करण्यात आलेल्या सर्व कामांची गुणवत्तापूर्ण आणि वेळेत अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे." - अभिषेक बारणे, सभापती, स्थायी समिती, पिंपरी चिंचवड महानगरपालिका