पिंपरी | २३ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवड शहरातील पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. पाणीगळती रोखणे, पिण्याच्या पाण्याचा अनावश्यक वापर टाळणे आणि पाणी बचतीच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, यासाठी सर्व संबंधित विभागांना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी निर्देश दिले आहेत. या कामात दुर्लक्ष किंवा निष्काळजीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना धरणातून ६.५५ टीएमसी, भामा आसखेड धरणातून २.१५ टीएमसी आणि आंद्रा धरणातून १.२९ टीएमसी, असे एकूण ९.९९ टीएमसी पाणी आरक्षण मंजूर आहे. शहराची अंदाजित लोकसंख्या ३८ लाख असून, दररोज सुमारे ६५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा उपलब्ध होत आहे. सध्या शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
महापालिकेच्या माहितीनुसार, १४ ऑक्टोबर २०२६ अखेर पवना धरणात ९७.१७ टक्के, तर आंद्रा धरणात ९५.८० टक्के पाणीसाठा होता. सप्टेंबर महिन्यात परतीचा पाऊस न झाल्याने उपलब्ध पाणीसाठा आणि मागील वर्षाचा अनुभव लक्षात घेऊन पाणी बचतीसाठी विशेष उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत, क्षेत्रीय कार्यालये, रुग्णालये, शाळा, भाजी मंडई आणि इतर इमारतींमधील नळ व पाणीपुरवठा उपकरणांची नियमित तपासणी करण्याचे आदेश स्थापत्य आणि पाणीपुरवठा विभागांना देण्यात आले आहेत. पाणीगळती आढळल्यास तातडीने दुरुस्ती करून पुन्हा गळती होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागणार आहे.
शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांमध्ये पाणी बचतीविषयी जनजागृती करावी, तर आरोग्य विभागाने सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये गरजेपेक्षा अधिक पाणी वापरले जाणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
क्रीडा आणि उद्यान विभागांना मैदानांवर पाणी फवारण्यासाठी तसेच झाडांना पाणी देण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याऐवजी संबंधित विभागांशी समन्वय साधून प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर करण्याचे नियोजन करावे लागणार आहे.
पाणीगळतीच्या तक्रारींचे तातडीने निराकरण व्हावे, यासाठी पाणीपुरवठा विभागाने माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या मदतीने जीपीएसच्या आधारे पाणीगळतीच्या तक्रारी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असेही निर्देश आहेत. दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत संबंधित विभागांनी पाठपुरावा करणे आवश्यक राहणार आहे.
विशेष म्हणजे, पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी प्रभावी कामगिरी करणाऱ्या प्लंबरचा सत्कार करण्याच्या सूचनाही महापालिकेने दिल्या आहेत.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, प्रत्येक विभागाने आपल्या कार्यक्षेत्रात नियमित तपासणी करून पाणी बचतीच्या उपाययोजना राबवाव्यात. शाळा, उद्याने, सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि महापालिकेच्या इतर आस्थापनांमध्ये पिण्याच्या पाण्याचा अनावश्यक वापर होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच पाणीगळतीच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करून उपाययोजनांचा नियमित आढावा घ्यावा.