पिंपरी-चिंचवड | २३ ऑक्टोबर २०२६ : पावसाळा ओसरल्यानंतरही पिंपरी-चिंचवड शहरात डासांचा प्रादुर्भाव कायम असल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारीनुसार, शहरात आतापर्यंत डेंग्यूचे ८१ आणि मलेरियाचे १३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.
वैद्यकीय विभागाच्या माहितीनुसार, शहरात तापाच्या २४ हजार २०७ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी मलेरियाचे १३ रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूच्या १ हजार ३९५ संशयित रुग्णांपैकी ८१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच चिकुनगुनियाचे ४ संशयित रुग्ण आढळले आहेत.
शहरातील भोसरी, पिंपरी, चिंचवड, वाकड, थेरगाव, पिंपळे सौदागर, मोशी आणि चिखली या परिसरांत डेंग्यूचे रुग्ण अधिक आढळले आहेत. या भागांमध्ये सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणी पाणी साचणे, सोसायट्यांच्या टेरेसवरील वस्तूंमध्ये पाणी जमा होणे, भंगार साहित्य आणि रिकाम्या भूखंडांवरील साचलेले पाणी यामुळे डासांच्या उत्पत्तीस पोषक वातावरण निर्माण होत आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत घरोघरी सर्वेक्षण करण्यात येत असून, डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी विविध जनजागृती उपक्रमही राबविण्यात येत आहेत. मात्र, कीटकजन्य आजारांचे रुग्ण आढळत असल्याने नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
दरम्यान, शहरात ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत स्वाईन फ्ल्यूचे ३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. सप्टेंबर महिन्यात स्वाईन फ्ल्यूचे ५८ रुग्ण आढळले होते. त्या तुलनेत ऑक्टोबरमधील रुग्णसंख्या कमी असल्याचे दिसून येते. ऑक्टोबरमधील तिन्ही रुग्ण वेगवेगळ्या भागांतील असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सध्या दिवसा कडक ऊन, तर सकाळी आणि संध्याकाळी थंडी असे बदलते वातावरण आहे. त्यामुळे सर्दी, खोकला आणि तापाच्या तक्रारी वाढत आहेत. ताप, सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी, थकवा आणि काही प्रकरणांमध्ये श्वास घेण्यास त्रास ही स्वाईन फ्ल्यूची लक्षणे असू शकतात.
महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने नागरिकांना घरातील पाण्याच्या टाक्या, हौद, माठ, कुलर आणि फ्रीजच्या मागील ट्रे दर आठवड्याला स्वच्छ करण्याचे आवाहन केले आहे. तसेच आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळावा, डासांपासून संरक्षणासाठी पूर्ण बाह्यांचे कपडे आणि मच्छरदाणी वापरावी, असे सांगण्यात आले आहे.
स्वाईन फ्ल्यूपासून बचावासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, आवश्यकतेनुसार मास्क वापरणे, वारंवार हात स्वच्छ धुणे आणि सर्दी-खोकला असलेल्या व्यक्तीपासून सुरक्षित अंतर राखणे आवश्यक आहे. लहान मुले, गरोदर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. ताप किंवा इतर लक्षणे जाणवल्यास स्वतःहून औषधोपचार न करता जवळच्या महापालिका दवाखान्यात किंवा डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे.