पिंपळे निलख येथील रक्षक चौकातील उड्डाणपूल वाहतूकीसाठी खुला

पिंपळे निलख येथील रक्षक चौकातील उड्डाणपूल वाहतूकीसाठी खुला

पिंपळे निलख येथील रक्षक चौकातील उड्डाणपूल वाहतूकीसाठी खुला 

आमदार शंकर जगताप यांच्या पत्राची प्रशासनाने तत्काळ घेतली दखल 

पिंपरी, ता. २३ - पिंपळे निलख येथील रक्षक चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर हा पूल वाहतूकीसाठी तत्काळ खुला करण्यात यावा, यासाठी चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता. आमदार जगताप यांच्या या पत्राची महापालिका प्रशासनाने सकारात्मक दखल घेतली आहे. प्रशासनाने तत्परता दाखवत सर्व तांत्रिक व सुरक्षाविषयक प्रक्रिया पूर्ण करुन हा उड्डाणपूल सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला केला आहे. 

​रक्षक चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असले तरी तो वाहतुकीसाठी खुला न झाल्याने या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. यामुळे स्थानिक नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांना रोज तासनतास कोंडीचा आणि वेळेच्या अपव्ययाचा सामना करावा लागत होता. ही गैरसोय दूर करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांनी थेट महापालिका आयुक्तांना पत्र लिहून संबंधित विभागामार्फत आवश्यक असणारे सुरक्षा ऑडिट व तांत्रिक तपासणी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. तसेच हा उड्डाणपूल जाहीर वापरासाठी लवकर खुला करण्याबाबत पत्रात नमूद केले होते.

आमदारांच्या या पत्राला प्रशासनाने तत्काळ प्रतिसाद दिला आणि आवश्यक त्या सर्व उपाययोजना पूर्ण करुन हा मार्ग खुला केला. या उड्डाणपुलामुळे आता औंध ते सांगवी फाटा आणि रावेतपासून पुढे किवळेपर्यंतचा प्रवास अधिक वेगवान, सुटसुटीत आणि सिग्नलमुक्त झाला आहे. तसेच औंध बीआरटी रस्त्यावरील वाहतूक कोंडी पूर्णपणे सुटण्यास मदत झाली आहे.

​या संदर्भात बोलताना महापालिकेच्या सहशहर अभियंता संध्या वाघ यांनी सांगितले की, पावसाळा जवळ येत असल्याने आणि पुलाखालील सेवा रस्त्यांच्या (सर्व्हिस रोड) दुरुस्तीच्या कामांमुळे या भागात वाहतुकीवर प्रचंड ताण येत होता. आगामी काळातील हा वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन आमदारांनी महापालिकेकडे पत्र पाठवून हा पूल तातडीने वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत कळवले होते. दरम्यानच्या काळात आचारसंहिता लागू झाल्यामुळे पुलाचे औपचारिक उद्घाटन करणे शक्य नव्हते, त्यामुळे तांत्रिक गोष्टींमध्ये हा पूल अडकून पडला होता. ​परंतु, ही सर्व परिस्थिती आणि आमदारांच्या पत्राची दखल घेत महापालिकेने तातडीने हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला. त्यातच सब-वेचे (अंडरपास) काम सुरु करण्यात आल्यामुळे या पुलावरुन वाहतुक वळवली आहे. यामुळे वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होईल. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories