पिंपरी-चिंचवडमधील साडेसहाशे शाळांकडे नाही....... 'अग्निसुरक्षा पूर्तता प्रमाणपत्र'
पिंपरी, ता. १७ - पिंपरी-चिंचवडमधील शाळांनी अग्निसुरक्षा पूर्तता प्रमाणपत्र घेतले नसल्याचे अग्निशमन विभागाने केलेल्या पडताळणीत निदर्शनास आले आहे. त्यामुळे अग्निशमन विभागाने ६५० शैक्षणिक संस्थांना अग्निसुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यासाठी पत्र पाठविले आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून दहा दिवसांत अधिकृत अग्निसुरक्षा प्रमाणपत्र घेण्याचे आवाहन केले आहे.
विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक शैक्षणिक संस्थेस अग्निशमन विभागाकडील शाळा व्यवसाय अग्नी सुरक्षितता पूर्तता प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे.
सर्व शाळांमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना करणे, त्या कार्यान्वित ठेवणे संस्थाचालकांची जबाबदारी आहे. मान्यताप्राप्त संस्थेकडून विहित नमुन्यातील प्रमाणपत्र महापालिका अग्निशमन विभागाकडे सादर करणे बंधनकारक आहे. अग्नीसुरक्षा प्रमाणपत्र नसल्यास कारवाई करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
त्यामुळे, अग्निशमन विभागाकडील व्यवसाय अग्नी सुरक्षितता पूर्तता प्रमाणपत्रासाठी संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने दहा दिवसांच्या आत अर्ज करावा.
शाळा इमारतीमधील अग्निशमन यंत्रणा सुरू आहे किंवा नाही, याबाबत शासनमान्य संस्थेकडून फायर ऑडिट करून घेणे गरजेचे आहे. परीक्षणामध्ये काही आक्षेप निघाल्यास त्याची पूर्तता करावी. अग्निपरीक्षणाचा अहवाल महापालिकेला सादर करावा, असे महापालिकेने सांगितले आहे.
याबाबत बोलताना महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे उपायुक्त व्यंकटेश दुर्वास म्हणाले, ''विद्यार्थ्यांना सुरक्षेची हमी देणे ही शैक्षणिक संस्थाचालक व मालकांची प्राथमिक जबाबदारी आहे. शहरातील शाळांनी अग्निसुरक्षा पूर्तता प्रमाणपत्र घेतले नसल्याचे पाहणीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच नोंदणी आणि अधिकृत अग्निसुरक्षा प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळाचालकांनी नियमांचे पालन करावे.''