तीन धोकादायक गुन्हेगारांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून स्थानबद्धतेची कारवाई
पिंपरी, ता. ५ ऑगस्ट २०२६ - दहशत माजवून गुन्हे करणे, खून, खूनाचा प्रयत्न, खून करण्यासाठी अपहरण करणे, दरोडयाची तयारी, जबरी चोरी, दुखापत करणे, दरोडयाचा प्रयत्न, खंडणी करीता अपहरण करणे, धाकदपटशा, विना परवाना दारु विक्री करणे, बेकायदेशिररित्या जुगार चालविणे, अग्निशस्त्रे व धारदार हत्यार जवळ बाळगणे...अशा गुन्ह्यांतील आरोपींवर शहर पोलिसांकडून कठोर कारवाई सुरु आहे. त्यानुसार, ३ गुन्हेगारांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एम.पी.डी.ए कायद्यान्वये कारागृहात ०१ वर्ष कालावधीसाठी स्थानबद्ध केले आहे.
कारवाई केलेल्या गुन्हेगारांची माहिती -
१) सांगवी पोलिस स्टेशन हद्दीत वास्तव्य करणारा दारुची विक्री करणारा व अट्टल गुन्हेगार नामे कोंडीबा आडेप्पा कांबळे (वय ३७ वर्षे, रा. सुदर्शन नगर, पिंपळे गुरव) हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने दारु विक्री सारखे ०९ गुन्हे केलेले आहेत. त्याचा स्थानबध्दतेबाबतचा प्रस्ताव पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे सांगवी पोलिस स्टेशन येथून प्राप्त झाला होता. त्याला हरसुल मध्यवर्ती कारगृह, छत्रपती संभाजीनगर येथे स्थानबद्ध केले आहे.
२) उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत वास्तव्य करणारा बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टी दारु तयार करणे व विक्री करणारा इसम नामे जीवन मारुती राजपूत (वय ४८ वर्षे, रा. गोनवडी ता. खेड) रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारु तयार करणे व विक्री करणे यांसारखे १४ गुन्हे केलेले आहेत. त्याचा स्थानबध्दतेबाबतचा प्रस्ताव उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस स्टेशनकडून प्राप्त झाला होता. त्याला हरसुल मध्यवर्ती कारगृह, छत्रपती संभाजीनगर येथे स्थानबद्ध केले आहे.
३) हिंजवडी पोलिस स्टेशन हद्दीत वास्तव्य करणारा व बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारु विक्री करणारा अट्टल गुन्हेगार नामे धनराज सोमाजी नट (वय ३५ वर्षे रा. माणरोड, हिंजवडी) हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारु विक्री करणे यासारखे ४ गुन्हे केलेले आहेत. त्याचा स्थानबध्दतेबाबतचा प्रस्ताव हिंजवडी पोलिस स्टेशनमधून प्राप्त झाला होता. याला येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे स्थानबध्द करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांनी वरीलप्रमाणे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पोलिस आयुक्तालय हद्दीत अवैध दारु व्यवसायाला शुन्य सहनशीलता आहे. समाजाच्या जीवाशी खेळणाऱ्या अवैध दारु माफियांना कोणतीही दया दाखवली जाणार नाही. कठोर कायदेशीर कारवाई करुन त्यांचे संपूर्ण जाळे उद्ध्वस्त केले जाईल. एम.पी.डी.ए. कायदयान्वये गुन्हेगारांना स्थानबद्धतेच्या माहे जानेवारी २०२६ ते जुलै २०२६ अखेर एकुण ११ कारवाया करण्यात आलेल्या आहेत. तसेच मागील वर्षी सन २०२५ मध्ये देखील वरील प्रमाणे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. कायदयान्वये स्थानबध्दतेच्या एकुण ३५ कारवाया करण्यात आल्या होत्या. त्यामुळे परिसरातील गुन्हेगारीत घट झालेली आहे. वरील प्रमाणे गुन्हेगारांवर केलेल्या कारवाईमुळे भविष्यातील गुन्हेगारी नियंत्रणात येणार आहे, असे पोलिस आयुक्तालयाने सांगितले आहे.