एक सप्टेंबरपासून रिक्षाची भाडेवाढ, पहिल्या दीड किलोमीटरसाठी ३० रूपये
पिंपरी, ता. ५ ऑगस्ट २०२६ - महागाई, सीएनजीचे वाढलेले दर यामुळे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या (आरटीए) बैठकीत रिक्षा भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या निर्णयानुसार एक सप्टेंबरपासून पहिल्या दीड किलोमीटरसाठी पाच, तर त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी तीन रुपये वाढ झाली. पहिल्या दीड किलोमीटरसाठी ३० रूपये आणि नंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी २० रुपये आकारले जाणार आहेत.
वाढती महागाई व सीएनजीच्या दरामुळे रिक्षा संघटनांनी भाडेवाढीची मागणी केली होती. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरांतील प्रवाशांना नव्या दरानुसार रिक्षा प्रवास करायचा आहे.
याबाबत बोलताना महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे संस्थापक बाबा कांबळे म्हणाले की, ''खटवा समितीच्या शिफारशीनुसार आणि सूत्रानुसार ऑटो रिक्षाच्या भाड्यात करण्यात आलेल्या नवीन भाडेवाढीचे मी स्वागत करतो. रिक्षाचालकांनी जास्त भाडे सांगू नये, रिक्षा चालकांनी मीटरप्रमाणेच भाडे आकारावे.''