'पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या विशेष शाखा - २'च्या नूतनीकृत कार्यालयाचे उद्घाटन
पिंपरी, ता. ६ ऑगस्ट २०२६ - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या विशेष शाखा - २ कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले असून कार्यालयाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने अधिकारी व अंमलदार यांच्या कार्यालयीन पोशाखामध्येही बदल करण्यात आला आहे. नूतनीकरण झालेल्या कार्यालयाचे उद्घाटन पोलिस आयु्क्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते दिनांक ४ ऑगस्टला झाले.
पोलिस आयुक्त चौबे यांनी विशेष शाखेतील अधिकारी व अंमलदार यांना शुभेच्छा देत, नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक व जलद गतीने सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यक्षमतेने व समर्पित भावनेने कार्य करण्याचे निर्देश दिले. तसेच आधुनिक सुविधा, सुबक कार्यालयीन वातावरण आणि अद्ययावत कार्यपद्धतीमुळे नागरिकाभिमुख सेवा अधिक प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त केला.
नवीन पोशाखानुसार पोलिस अधिकाऱ्यांसाठी पांढरा शर्ट व काळी पॅन्ट, पोलिस अंमलदारांसाठी फिकट निळ्या रंगाचा शर्ट, ग्रे रंगाची पॅन्ट तसेच पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचा लोगो असलेला कोट निश्चित करण्यात आला आहे. या बदलामुळे कार्यालयीन शिस्त, एकसमानता व व्यावसायिकता अधिक प्रभावीपणे अधोरेखित होणार आहे.
या कार्यक्रमास डॉ. शशिकांत महावरकर (पोलिस सह आयुक्त), सारंग आवाड (अपर पोलिस आयुक्त (गुन्हे)), डॉ. बसवराज तेली (अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग)), रोहिदास पवार पोलिस उप आयुक्त (गुन्हे शाखा), धीरज पाटील, पोलिस उप आयुक्त (विशेष शाखा), गणेश इंगळे, पोलिस उप आयुक्त (मुख्यालय), सुनील पंधरकर, सहायक पोलिस आयुक्त (विशेष शाखा), संजय नरावाड (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विशेष शाखा २), राजश्री पावरा (सहायक पोलिस निरीक्षक, परकीय नागरिक नोंदणी विभाग) उपस्थित होते.