'ट्रॅफिक बडी' ऑनलाईन वॉट्सअॅप चॅटबॉटव्दारे नागरिकांच्या १ हजार ३६५ तक्रारी निकाली
पिंपरी, ता. ११ - वाहतूकीसंदर्भातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून 'ऑनलाईन वॉट्सअॅप चॅटबॉट' उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या चॅटबॉद्वारे वाहतूक शाखेने मे महिन्यात नागरिकांच्या १ हजार ३६५ तक्रारी सोडवल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशाने पोलिस सह आयुक्त शशीकांत महावरकर व अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड यांच्या सूचनांप्रमाणे व मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये ट्राफिक बडी हा ऑनलाईन वॉट्सअॅप चॅटबॉट उपक्रम कार्यान्वित केला आहे.
या वॉट्सअॅप चॅटबॉटवर नागरुकांना, १) वाहतूक नियमांचे उल्लघंन, २) वाहतूक कोंडी, ३) अनियमितता नोंदवा, ४) रस्ता खराब असल्याबाबत, ५) बेकायदेशीर पार्किंगबाबत, ६) ट्रॅफिक सिग्नल, ७) वाहतूक सूचना, ८) जड अवजड वाहनांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन या वेगवेगळ्या विशेष शिर्षकाखाली आपली तक्रार फोटोसह नोंदविता येते.
तक्रार नोंदविल्यानंतर सदर तक्रारीचे निवारण २४ तासांचे आत केले आते. तक्रारीचे निराकरण झालेबाबत तक्रारदार यांना संदेशाद्वारे तत्काळ सूचित करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ट्राफिक बडी वॉट्सअॅप चॅट बॉटवर शहरातील वाहतूक कोंडी, वाहतूक नियमन वगैरे समस्या सोडविण्याकरीता नागरिकांचा सक्रिय सहभाग व्हावा करीता ट्राफिक बडी वॉट्स अॅप चॅट बॉटवर इच्छुक असलेल्या स्वयंसेवकांची नोंदणी करता येते. मे २०२६ मध्ये ट्राफिक बडी वॉट्सअॅप चॅट बॉटवर पिंपरी चिंचवड आयुक्तालय कार्यक्षेत्रातून एकूण १ हजार ३६५ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.