परराज्यातील मजुरांना मारहाण करुन त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे लुटणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक
परराज्यातील मजुरांना मारहाण करुन त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे लुटणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक
पिंपरी, ता. ५ ऑगस्ट २०२६ - परराज्यातील मजुरांना मारहाण करुन त्यांच्याकडून जबरदस्तीने ऑनलाईन पैसे घेणाऱ्या रेकॉर्डवरील २ आरोपींना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा - युनिट-२ च्या पथकाने अटक केली. चौकशीत आरोपींनी जबरी चोरीचे ३ गुन्हे केल्याचे उघड झाले आहेत. आरोपींकडून ३ मोबाईल फोन आणि गुन्हा करण्याकरिता वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
दिनांक २६ जुलै २०२६ रोजी महाळुंगे ते तळवडे रोडवरील महिंद्रा कंपनी गेट नं-१ येथे दोन दुचाकीवरुन आलेल्या ४ अनोळखी इसमांनी एका इसमास अडवून त्याचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेऊन त्याच्या फिंगरप्रिंटने त्याचा मोबाईल फोन उघडुन सदर इसमाच्या फोन पे अकाउंटमधून जबरदस्तीने २५,०००/- रुपये त्यांच्याकडे असणाऱ्या मोबाईलमधील गुगल पेद्वारे वळते करुन घेतले. या प्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्याचा तपास करताना आरोपींनी ज्या गुगल पे वरती पैसे घेतले होते तो मोबाईल फोन देखील चोरीचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. तसेच आरोपींनी चोरीच्या मोबाईल फोनवर घेतलेले पैसे वेगवेगळ्या मनी ट्रान्सफरच्या दुकानातून कॅश काढून घेतल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार, तपास पथकाने ज्या ठिकाणी आरोपींनी पैसे काढले अशा सर्व ठिकाणाचे अंदाजे ७० ते ८० सी.सी.टी.व्ही कॅमेरे तपासले. परंतु, आरोपींबाबत काही एक माहिती मिळत नव्हती. त्यामुळे पथकाने आरोपींनी ज्या-ज्या ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत व ज्या मनी ट्रान्सफरच्या दुकानातून कॅश काढून घेतली आहे त्यासर्व ठिकाणांबाबत सखोल तांत्रिक विश्लेषण करुन आरोपींना शोधून काढले.
आरोपी केशव दशरथ शेटे (वय ४६ वर्षे, रा. पिंपरीगाव) व राजेश अनिल कुमार (वय ४५ वर्षे, रा. ताडीवाला रोड) यांना ३ ऑगस्टला पिंपरी परिसरातून शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्या दोघांनी व त्यांच्या इतर दोन साथिदारांनी ३ गुन्हे केल्याचे समोर आले. आरोपींकडून ३ मोबाईल फोन आणि गुन्हा करण्याकरिता वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून ते परराज्यातील मजुरांना सुट्टीच्या दिवशी एकटे गाठून त्यांना जबरदस्ती करुन त्यांचेकडून ऑनलाईन व कॅश स्वरुपात पैसे काढून घेत असत. हे पैसे आरोपी चोरी केलेल्या मोबाईल फोनच्या गुगल पे वरती घेत असत आणि मनी ट्रान्सफरच्या दुकानातुन रोख रक्कम काढून घेत असत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
सदरची कारवाई पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलिस आयुक्त बसवराज तेली, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड, पोलिस उप-आयुक्त, गुन्हे रोहिदास पवार, सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे-१ सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट-२ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदिप सावंत, पोलिस उपनिरीक्षक मयुरेश साळुंखे, श्रेणी पोलिस उपनिरीक्षक दिपक खरात, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नितीन ढोरजे, संदिप गवारी, पोलिस हवालदार विक्रम कुदळ, कुणाल शिंदे, भाऊसाहेब राठोड, अली शेख, दिपक शिरसाट, कृष्णा शितोळे, पोलिस नाईक रामचंद्र तळपे, पोलिस शिपाई प्रशांत सैद, रवि पवार, सुखदेव गावंडे, अमर राणे, दिनकर आडे, धनंजय जाधव आणि तांत्रिक विश्लेषण विभाग यांनी केली आहे.