'पीएमपी' कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे बसप्रवासात हरवलेले पाकीट मिळाले परत
पिंपरी, ता. ५ ऑगस्ट २०२६ - 'पीएमपी'च्या बसने प्रवास करताना भारतीय सैन्यातील एका अधिकाऱ्यांचे हरवलेले पाकीट त्यांना 'पीएमपी' कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे परत मिळाले.
दिनांक ३१ जुलैला पुणे स्टेशन ते एनडीए गेट या मार्ग क्र. 174 वरील बसमध्ये भारतीय सैन्यातील अधिकाऱ्यांचे पाकीट हरवले होते. पाकीट हरवल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी गेट क्र. 10 वरील कंट्रोल केबिनमध्ये याबाबत माहिती दिली. त्यांनतर पीएमपीचे कर्मचारी गणेश अहिरे यांनी प्रसंगावधान राखून बसचा तपशील तत्काळ पडताळला व कोथरूड स्थानकावरील टी.टी. मेकॅनिकल लोंढे यांच्याशी संपर्क साधून बसची तपासणी करण्यास सांगितले. तपासणीत हरवलेले पाकीट बसमध्ये सुरक्षित असल्याचे आढळून आले. पुढे, आवश्यक पडताळणी करून ते पाकीट संबंधित अधिकाऱ्यांना सुरक्षितपणे परत देण्यात आले.
कर्तव्यदक्षता, प्रामाणिकपणा, तत्परता आणि प्रवाशांप्रती असलेली जबाबदारी यांचा आदर्श घालून दिल्याबद्दल गणेश अहिरे (DR-5050) तसेच श्री. लोंढे यांचे 'पीएमपी' व्यवस्थापनाने अभिनंदन केले आहे.