राज्यस्तरीय सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा कार्यशाळा पूर्ण, साडेचारशे प्रशिक्षणार्थींचा सहभाग
Feb 26 2026
37
राज्यस्तरीय सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा कार्यशाळा पूर्ण, साडेचारशे प्रशिक्षणार्थींचा सहभाग
पिंपरी, ता. २६ - शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने वाकडमध्ये नुकतीच राज्यस्तरीय सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा (Comprehensive Primary Health Care) कार्यशाळा घेण्यात आली. राज्यभरातील सुमारे ४५० प्रशिक्षकांनी यात सक्रिय सहभाग घेतला. येत्या वर्षभरात राज्यातील प्रत्येक आरोग्य संस्थेतील डॉक्टर्स, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवेबाबत प्रशिक्षण देणे हा कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्राथमिक आरोग्य सेवांचे महत्त्व सांगितले. सक्षम आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना उत्तम प्रशिक्षण देण्याबाबत सूचना दिल्या. पुणे प्राथमिक आरोग्य सेवेचे संचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी प्रशिक्षकांच्या कार्यपद्धती, समन्वय व्यवस्था आणि उपकेंद्र ते राज्यस्तरापर्यंतच्या यंत्रणेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण प्रधान यांनी १३ प्रकारच्या आरोग्य सेवांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. आरोग्य सेवा-कुटुंब कल्याण, पुणे केंद्राचे अतिरिक्त संचालक डॉ. संदीप सांगळे, डॉ. अजय डवले, डॉ. योगेंद्र सवई यांनी प्रशिक्षण आराखडा व अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले. माजी संचालक डॉ. सुभाष साळुंखे, डॉ. अर्चना पाटील, डॉ. मोहन जाधव, डॉ. सतीश पवार यांनीही मार्गदर्शन केले.